विज्ञान व तंत्रज्ञान आधारीत नावीन्यपूर्ण प्रकल्पांचे प्रदर्शन
पुणे। विज्ञानाश्रम संस्थेच्या वतीने विज्ञान व तंत्रज्ञान आधारीत नावीन्यपूर्ण प्रकल्पांचा समावेश असलेल्या ‘टेक्नोवेशन’ या प्रदर्शनाचे शनीवारी, ५ मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे. विज्ञान आश्रम चे संचालक डॉ योगेश कुलकर्णी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
जे. पी. नाईक सेंटर, एकलव्य कॉलेज च्या पाठीमागे, कोथरुड डेपो, पुणे येथे दुपारी १ ते ४ चा वेळात केले आहे.सकाळी 11 वाजता त्यांचे उद्घाटन एल अॅण्ड टी इन्फोटेकचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यूष पांड्या , सुनील लोखंडे व सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठाच्या डिझाईन, इनोव्हेशन सेंटरच्या समन्वयक डॉ. पूजा दोशी यांच्या उपस्थितीत होणार आहे.हे प्रदर्शन ऑनलाइन स्वरूपात पण http://www.technovision.online/ या संकेतस्थळावर उपलब्ध असेल.
शाळेतील मुलांना विज्ञान व तंत्रज्ञान याची गोडी लागुन भविष्यामध्ये आपल्या आवडीच्या विषयामध्ये करियर करता यावे व संशोधक वृत्ती विकसित व्हावी यासाठी विज्ञान आश्रम पाबळ यांच्या वतीने महाराष्ट्र, छत्तीसगड व उत्तरप्रदेश येथील १60 + शाळांमध्ये ८वी ते १० वी च्या मुलांना मुलभुत तंत्रज्ञानाची तोंडओळख (Introduction to Basic Technology) या विषयाचे शिक्षण दिले जाते. यासाठी विविध कंपन्यांची मदत होत असते. पुण्यामध्ये वन स्टेप – एल अँड टी इन्फोटेक या कंपनीच्या सहकार्यांने १५ शाळांमध्ये हा उपक्रम चालु आहे.
कोविड लॉकडाउन च्या काळात IBT अभ्यासक्रम चालू असलेल्या शाळेतील विद्यार्थी आपल्या घरीच विविध प्रकल्प बनवत होती. त्यासाठी त्यांना ऑनलाइन मार्गदर्शन मिळत होते. त्यांना शाळेतून साधने व मटेरियल पुरवले जात असे. शाळा बंद असतांना सुद्धा पुणे परिसरातील 15 शाळांनी अनेक समाजोपयोगी प्रकल्प केले. या प्रकलपांचा समावेश ‘टेक्नोवेशन’ मध्ये असणार आहे.
सकाळी हे प्रदर्शन पाहुण्यांसाठी राखीव असेल तर दुपारी 1 ते 4 या वेळेत सर्वांसाठी खुले असेल. या प्रदर्शनामध्ये १५ शाळा एकूण ३० प्रकल्प मांडणार आहेत. या प्रकल्पांचे वैशिष्ट्ये म्हणजे विद्यार्थांनी स्वतःच्या, समाजाच्या व शाळेमधील समस्यांचे निराकरण करण्यासाठी मुलभुत तंत्रज्ञानामध्ये आत्मसात केलेल्या ज्ञानाचा व कौशल्याचा कलात्मकतेने उपयोग करून घेतला आहे व समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध प्रकल्प तयार केले आहेत. तसेच प्रदर्शनामध्ये मांडण्यापुर्वी त्याचा उपयोग करून पाहीला आहे. इतकेच नाही तर प्रकल्पाला लागणारे साहीत्य स्थानिक पातळीवरती मिळणारे, टाकाऊतून टिकाऊ, व कमी किमतीत उपलब्ध होणारे असे वापरलेले आहे. ज्यामुळे प्रकल्पाची येणारी किंमत ही सर्वसामान्यांना परवडेल अशीच आहे.
पालकांनी व शिक्षकांनी मुलांना आवर्जून दाखवे असे हे प्रदर्शन आहे. यामध्ये शाळा तसेच कॉलेज मधील विद्यार्थीही सहभागी होऊ शकतात. विज्ञान आश्रमाच्या पुण्यातील DIY Lab तर्फे शाळेतील प्रकल्प तसेच Atal Tinkering Lab साठी पण प्रशिक्षण घेतले जाते. DIY Lab ले पण मागील वर्षी केलेले प्रकल्प सुध्दा यावेळी प्रदर्शित केले जाणार आहे.