रात्रीच्या वेळी कळसूबाई शिखरावर साहसी चढाई
निसर्ग संवर्धन कार्याबरोबरच महाराष्ट्रातील कठीण दुर्ग व अभयारण्ये यामध्ये सतत साहसी ट्रेकचे आयोजन करणाऱ्या नांदेडच्या निसर्ग मित्र मंडळाच्या साहसी चमूने शनिवारी सकाळी नांदेडहून तपोवन एक्सप्रेस ने प्रस्थान करून इगतपुरी - भंडारदरा करून रतनवाडी या निसर्गरम्य परिसरात रात्रीचा मुक्काम केला .
रविवारी पहाटे सुप्रसिद्ध कोरीव शिल्पकलेचे अमृतेश्वर मंदिर पाहून जवळच असलेल्या साम्रद गावातून दीडशे फूट खोल रॅपलिंग करीत अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण परिसरातील आशिया खंडातील दोन क्रमांकाची महाकाय घळ असलेली सांदन दरीत प्रवेश करून रोमहर्षक ट्रेक केला. आणि त्याच दिवशी सायंकाळी कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या बारी या गावी पोहोचले. रविवारीच रात्री सात वाजता शिखरावर चढाई सुरु करून दोन अडीच तासाची अवघड चढाई करून टेन्ट कॅम्पिंग केली. शुभ्र चांदण्यांच्या आभाळी चादरीवर व परिसरातील इगतपुरी पर्यंत दिसणाऱ्या गावातील लुकलुकणाऱ्या हजारो लाखो दिवे यांच्या साक्षीने घेतलेला शेकोटीचा व झणझणीत पिठले भाकरी जेवणाचा आनंद तर अवर्णनीय होता.
ते चार मिनिटे म्हणजे या चमूच्या आयुष्यातील अवर्णनीय क्षण. सूर्योदयाचा अविस्मरणीय असा अनुभव शिखरावर घेतला. त्यानंतर खाली दिसणारे भंडारदरा धरणाचे बॅक वॉटर, त्याचे काठी दिमाखदार अंगठा वर करून उभा असलेला रतनगड, पाठीमागे असणारे अलंग, मदन व कुलंग किल्ल्यांचे बेलाग सुळके व समोर घोटी पर्यंत दिसणाऱ्या परिसरातील एकामागे एक अशा दिसणाऱ्या डोंगररांगा अशा पार्श्वभूमीवर शिखरावर कळसुबाई चे छोटेसे मंदिर आहे. हा सर्व निसर्ग डोळ्यात व कॅमेरात साठवून परतीचा प्रवास सकाळच्या लख्ख प्रकाशात सुरु केला. मालेगाव नांदेडचे साहसी हिमालय ट्रेकर ओमेश पांचाळ यांनी नियोजन केलेल्या
या ट्रेकचे नेतृत्व डॉ. प्रमोद देशपांडे यांनी केले होते. या मोहिमेत पंकज, सौ. परिणीता, गुंजन हा संगीतमय शिरभाते परिवार तसेच वैष्णवी डोईफोडे, पुरुषोत्तम जयसिंगकर, अविनाश चव्हाण व सुभाष चुटे यांनी सहभाग घेतला होता. निसर्ग मित्र मंडळ यापुढे असेच काही नाईट ट्रेक चे आयोजन करणार आहेत. त्यात साहसी युवा मंडळींनी भाग घ्यावा असे आवाहन निसर्ग मित्र मंडळ नांदेडचे अध्यक्ष डॉ. जगदीश देशमुख यांनी केले आहे.