मुंबई| शीख धर्माच्या महान गुरूंनी धर्म रक्षणार्थ एकीकडे स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले, तर दुसरीकडे मनुष्याच्या आत्मोद्धारासाठी उत्तम संतसाहित्य निर्माण केले. या संत साहित्यातून आत्म्याला शांती मिळते तसेच मनुष्याला सजग राहण्याचा संदेश मिळतो, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
शिखांचे नववे गुरु तेगबहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वानिमित्त (जन्मजयंती) मंगळवारी (दि. २२) राजभवन येथे किर्तन दरबाराचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी राज्यपाल कोश्यारी बोलत होते. किर्तन दरबार सोहळ्याला अनेक प्रतिष्ठित शीख बांधव उपस्थित होते.
गुरु तेगबहादूर यांनी धर्मासाठी व राष्ट्रासाठी जसे प्राणांचे बलिदान दिले, तसेच बलिदान त्यांच्या पूर्वजांनी व त्यांच्या मुलांनी देखील दिले होते. गुरु तेगबहादूर यांच्या प्रेरणादायी जीवनातून आपण काही शिकलो नाही तर पुनश्च आपल्याला धार्मिक आक्रमणाचा सामना करावा लागेल, असे राज्यपालांनी सांगितले. राजभवनाच्या नवीन दरबार हॉल मध्ये प्रथमच शब्द किर्तन होत असल्यामुळे राजभवन धन्य झाले आहे, असे उद्गार राज्यपालांनी यावेळी काढले.
यावेळी दमदमी तकसाळचे अध्यक्ष बाबा हरनाम सिंह, अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा, पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल, निर्मल संत डॉ रामेश्वरानंद, भारत सरकारच्या प्रकाश पर्व समितीचे सदस्य जी. एस गिल, शीख संगतचे राष्ट्रीय सचिव राजन खन्ना, महाराष्ट्र शीख असोसिएशनचे निमंत्रक मलकित सिंह बल आदी प्रामुख्याने उपस्थित होते.