नांदेड| महाडच्या चवदार तळ्याचा क्रांतीसंगर हिंदू समाजाच्या रूढी-परंपरांच्या विरोधी होता. तो एकाच वेळी सामाजिक सुधारणेचा लढा होता, आणि धर्मसुधारणेचाही लढा होता. म्हणून तो हिंदू संघटनेचा देखील लढा होता. तसेच तो सामाजिक समता आणि सामाजिक न्यायासाठी होता, असे प्रतिपादन तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक तथा आॅल इंडिया भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष धम्मगुरू भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले.
यावेळी भिक्खू चंद्रमणी, भिक्खू धम्मकिर्ती, भिक्खू श्रद्धानंद, भंते सुदत्त, भंते सुनंद, भंते शिलभद्र, भंते सुप्रिय, भंते शाक्यपुत्र, उपप्राचार्य साहेबराव इंगोले, प्रा. एस. एच. इंगोले, प्रा. विनायक लोणे, विलास वाठोरे, साहित्यिक प्रज्ञाधर ढवळे, एलआयसीचे वामन बलखंडे, पाली भाषा अभ्यासक राहुल कोकरे, दिगांबर धुताडे, शांताबाई धुताडे, साहेबराव नरवाडे आदींची उपस्थिती होती. तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात फाल्गुन पौर्णिमेनिमित्त 'पौर्णिमोत्सव' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला खुरगाव येथील उपासक साहेबराव नरवाडे यांनी भिक्खू संघाला भोजनदान दिले.
त्यानंतर सर्व उपासक उपासिका यांच्या उपस्थितीत बोधीपुजा संपन्न झाली. त्यानंतर भिक्खू संघाचे मंचावर आगमन झाले. तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन वसमत येथील कोल्हे दांपत्याच्या हस्ते झाले. उपासकांच्या याचनेवरुन भिक्खू संघाने उपस्थितांना त्रिसरण पंचशील तथा अष्टशील दिले. त्रिरत्न वंदना गाथापठणानंतर कार्यक्रमास प्रारंभ झाला. पुढे बोलताना भदंत पंय्याबोधी थेरो म्हणाले की, चवदार तळ्याच्या लढ्याच्या वेळी बाबासाहेबांचा असा प्रयत्न होता की या माध्यमातून अस्पृश्यांना आपल्या उद्धारासाठी संघटितपणे लढण्याची प्रेरणा यांतून मिळेल. महाड येथील चवदार तळ्याचे पाणी पिऊन आपला माणुसकीचा आणि समतेचा हक्क सिद्ध करण्याच्या निर्धाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन लढा देण्याची ही पहिलीच सामुदायिक कृती होती. यावेळी आधी बाबासाहेब आणि नंतर सर्वांनी पाणी प्राशन करत आपला समतेचा संदेश दिला.
दरम्यान, उपसंपदा झालेल्या भिक्खू चंद्रमणी, भिक्खू धम्मकिर्ती व भिक्खू श्रद्धानंद यांचा उपासकांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. तसेच साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे यांचाही पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य साहेबराव इंगोले यांनी केले. सूत्रसंचालन प्रज्ञाधर ढवळे यांनी तर आभार साहेबराव नरवाडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिद्धांत इंगोले, सुरेखा इंगोले, प्रफुल्लता वाठोरे, उमाजी नरवाडे, सुरेखा नरवाडे, अनिता नरवाडे, कल्याणी नरवाडे, सागरबाई नरवाडे, आप्पाराव नरवाडे, नागोराव नरवाडे, राहुल नरवाडे, सूरज नरवाडे, सम्राट नरवाडे, वैशाली साळवे, सागरबाई जाधव आदींनी परिश्रम घेतले. यावेळी शहरातील मैत्री महिला मंडळ, सुजाता महिला मंडळ, विशाखा महिला मंडळ तसेच महाप्रजापती नगर, राज नगर, माळवटा, वसमत आदी विविध ठिकाणांहून बौद्ध उपासक उपासिका बालक बालिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. साहेबराव नरवाडे यांनी सर्व उपासक उपासिकांना भोजनदान दिले.