नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मा. विद्या परिषदेच्या बैठकीमध्ये नुकताच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. यापुढे माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक शिक्षकांना डॉक्टरेट होण्यासाठी आता ‘पेट’ परीक्षा उत्तीर्ण होण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे त्यांना पीएचडी करणे आता सोपे झाले आहे.
या मा. विद्यापरिषदेच्या बैठकीतील निर्णयानुसार शिक्षकांना काही अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना शासनाची मान्यता असावी. सलग दहा वर्षाचा अध्यापनाचा अनुभव असावा. शिक्षकांची दोन शोध निबंध नामांकित व मान्यताप्राप्त संशोधन पत्रिकेमध्ये प्रकाशित झालेले असावे.
शासनाचे मान्यता पत्र, अनुभव प्रमाणपत्र व संबंधित संस्थेचे नाहरकत प्रमाणपत्र आणि प्रसिद्ध झालेले दोन शोधनिबंध प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. वरील अटीची पूर्तता करणाऱ्या शिक्षकास पीएचडी साठी लागणारी पात्रता ‘पेट’ परीक्षेतून सूट देण्यात येणार आहे. असे पदव्युत्तर विभागाचे सहा.कुलसचिव पुरूषोत्तम कुलकर्णी यांनी कळविले आहे.