वाळू, पाणी, नदी आणि शेती यांचा जवळचा संबंध आहे. वाळू नदीची शोभा आणि आरोग्य वाढविते. तिच्यामुळे सभोवतालच्या पर्यावरणाचे संवर्धनदेखील होते. पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी सागितले "वाळू हा नदीच्या पर्यावरण यंत्रणेचा अविभाज्य घटक आहे. पाणी शुद्ध करण्याचं, पाणी जिरवण्याचं, पाण्यातले असंख्य जीव (छोटे मासे, खेकडे इ.) या सगळ्यांना जिवंत ठेवण्याचं काम वाळू करत असते.
वाळूशिवाय नदी मृत होते, नदीतली जीवसंपदा नष्ट होते... शहरीकरणामुळे आणि बांधकाम व्यवसायातील वाढत्या मागणीमुळे वाळूची मागणी वाढत आहे. त्यातून नद्यांमधील वाळूचा उपसा होत आहे. बेसुमार आणि बेकायदा वाळूउपशामुळे नद्यांमधील वाळू संपुष्टात येत आहे. नद्यांमधील वाळू संपणे ही केवळ पर्यावरणीय समस्या नाही, तर वाळूच्या अर्थ-राजकारणामुळे नदीपात्राजवळील गावांमध्ये भीषण सामाजिक प्रश्नदेखील निर्माण झाले आहेत.
वाळू असलेल्या नद्या दृष्टीस पडणे हा दुर्मिळ योगायोग ठरत आहे. या पार्श्वभूमीवर वाळूसंवर्धन करणे हे जवळजवळ दिवास्वप्न वाटावे, अशी भयावह परिस्थिती वाळूच्या अर्थकारणामुळे निर्माण झाली आहे. कायदेशीर (शासकीय लिलावाच्या माध्यमातून होणारा शासनमान्य वाळूउपसा) आणि बेकायदा (शासकीय ठेक्याच्या प्रमाणापेक्षा जास्त किंवा चोरून नदीपात्रातील वाळूचा उपसा) मार्गांनी वाळूचा बेसुमार उपसा होत आहे. वाळूमधील आकर्षक अर्थकारणामुळे वाळू असलेल्या भागांमध्ये वाळूमाफियांचा नवा गुन्हेगारी वर्ग तयार झाला आहे.
नद्यांमधील वाळूचा उपसा करून त्यातून येणाऱ्या सहज पैशांमुळे या वर्गांचा प्रभाव व भीती स्थानिकांमध्ये वाढली आहे. हे माफिया स्थानिकांना तर जुमानतच नाहीतच, परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दहशत बसेल अशा प्रकारचे वर्तन करतात.वाळू ही ग्रामीण भागातील नदीपात्रामध्ये मिळत असल्याने त्याच्याशी निगडित घटक ग्रामीण भागात असतात. ग्रामीण भागाचे प्रश्न प्रसारमाध्यमांच्या केंद्रस्थानी असतीलच असे नाही. तसेच वाळूमाफियांच्या दहशतीने एखाद्या गावकऱ्याला वाळूचे महत्त्व समजले तरी तो वाळूतस्करी विरोधात आवाज उठवू शकत नाही.
अशी जाण असणारे गावोगावी आहेत, मात्र त्यांच्या प्रयत्नांना सामूहिक साथ आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची जोड नसल्याने वाळूसंवर्धनाची चळवळ निर्माण होत नाही. वाळूतस्करीच्या समस्येवर खालून फारसा आवाज निर्माण होत नाही. शिवाय वाळूच्या संवर्धनाचे फायदे आणि तिच्या उपशामुळे होणारे दूरगामी परिणाम याची जाणीव स्थानिकांना नसल्याने गावातील एखादी व्यक्ती किंवा काही व्यक्ती एकत्रित येऊन वाळूचे फायदे घेतात, त्याचे दुष्परिणाम सर्व गावाला भोगावे लागतात. या लेखामध्ये एका अशा गावाची गोष्ट आहे, जिथे संपूर्ण गावाला वाळूउपशाचे दुष्परिणाम आणि वाळूसंवर्धनाचे फायदे लक्षात आल्याने त्यांनी एकत्रित येऊन वाळू-संवर्धनासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते..
.....कल्याण पाटील वानखेडे, पळसपुर, ता हिमायतनगर