प्राध्यापक संघटनांची उच्च शिक्षण संचालकांकडे मागणी
नांदेड| शासनाने प्राध्यापक व शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधीत जमा होणार्या सातव्या वेतन आयोगाच्या फरकातील अर्ध्या रक्कमेतून आयकर (टीडीएस) भरुन घ्यावा, अशी मागणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि कॉलेज शिक्षक असोसिएशन अर्थात स्वामुक्टाने राज्याचे उच्च शिक्षण संचालक यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे केली आहे.
राज्याचे उच्च शिक्षण संचालक यांनी प्राचार्यांना एक पत्र पाठवून 31 मार्च पूर्वी आपापल्या संस्थेतील प्राध्यापक व शिक्षकांच्या वेतनातून सातव्या वेतन आयोगा प्रमाणे मिळणार्या पगारात आयकर कपात करुन घ्यावा., अशा सुचना दिल्या आहेत. वास्तविक शासनाने राज्यातील प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. यातील अर्धा हिस्सा केंद्र सरकार आणि अर्धा हिस्सा राज्य शासन देणार आहे. 39 महिन्यांच्या फरकाची अर्धी रक्कम भविष्य निर्वाह निधीत जमा करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. या संदर्भातील शासन आदेश व शिक्षण संचालकांच्या निर्देशानुसार नांदेड येथील सहसंचालकांनी प्राध्यापक व शिक्षकांच्या फेब्रुवारीच्या वेतनातून आयकर कपात करुन घ्यावा, असे निर्देश प्राचार्यांना दिले आहेत.
असे झाले तर प्राध्यापकांना उणे वेतन मिळेल. कायद्यानुसार उत्पन्नाच्या 60 टक्के रक्कमेतून कुठलीही कपात करता येते. सहसंचालकांच्या आदेशानुसार कपात झाल्यास प्राध्यापकांसमोर अनेक आर्थिक अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे राज्य शासनाने भविष्य निर्वाह निधीत जमा होणार्या फरकाच्या रक्कमेतून आयकर कपात करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर स्वामुक्टाचे अध्यक्ष डॉ.बी.के.शिंदे, सचिव प्रो.सूर्यकांत जोगदंड यांच्या स्वाक्षर्या आहेत.