हिमायतनगर ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस जमादार या पुर्वी भोकर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असतांना दिवशी बु. येथे एका सालगड्याने पाच वर्षीय बालिकेचे अपहरण करून तिच्यावर पाशवी अत्याचार करून तिचा निर्घृण खून केला. हि संतापजनक घटना दि. २० जानेवारी २०२१ रोजी घडली होती. सदरील घटनेचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटले होते. दि. २१ जानेवारीला आरोपी बाबुराव खंडू सांगेराव वय ३५ वर्ष याचेवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक ( पोक्सो ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गंभीर घटनेचा तपास विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळ राजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास पाटील, सहायक पोलीस निरीक्षक शंकर डेडवाल , पो. उप नि. अनिल कांबळे, जमादार अशोक सिंगणवाड यांच्यासह इतर पोलीस यांनी अतिशय सुक्ष्म पद्धतीने अवघ्या १९ दिवसात या गंभीर घटनेचा तपास पुर्ण करुन गुन्ह्याचे दोषारोपपत्र दि. १० फेब्रुवारी २०२१ रोजी जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले होते.
जमादार अशोक सिंगणवाड, यांच्यासह पोलीस कर्मचारी धोंडीराम केंद्रे, शेषेराव चव्हाण, फेरोजखान, दत्ता कदम, रवि मुधोळे, प्रकाश श्रिरामे, ज्ञानेश्वर सरोदे, नामदेव शिरोळे, मंगेश श्रिसागर, आदी पोलीस कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले होते. खटल्यातील साक्षीदारांची साक्ष व तसेच घटनास्थळावरील सबळ पुरावे, वैद्यकीय अहवाल आदि सर्व बाबी त्या आरोपींच्या विरुद्धच्या सर्व कलमानुसारचा गुन्हा अखेर सिद्ध झाल्याने केवळ अवघ्या २३ दिवसात या गुन्ह्याचा निकाल जिल्हा न्यायाधीश मुजीब एस. शेख यांनी दि. २३ मार्च २०२१ रोजी दिला होता.
यात आरोपीस मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली होती.सदरील गुन्ह्याचा तपास उत्कृष्ट, सबळ असा तपास केल्यामुळे पोलीस निरीक्षक विकास पाटील, व सहायक पोलीस निरीक्षक शंकर डेडवाल जमादार अशोक सिंगणवाड यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र व तसेच प्रोत्साहन पर बक्षीस देऊन जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे, विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या हस्ते दि.०५ मार्च शनिवारला एका भरगच्च कार्यक्रमात त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
सद्यस्थितीत हिमायतनगर येथे ही जमादार अशोक सिंगणवाड यांनी अनेक गंभीर गुन्ह्यासह घरफोडी, चोऱ्या उघड केल्या आहेत. हिमायतनगर बिट मध्ये ही जमादार अशोक सिंगणवाड यांची कामगिरी वाखाणण्याजोगी असून त्यांच्यावर मोठ्याप्रमाणात सुभेच्छाचा वर्षाव होत आहे.