रत्नधाव फाउंडेशन व महालँड आणि दुबई येथील सफर संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य दशरथ लोहबंदे यांना दि. २८ रोजी दुबई येथे जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.हा पुरस्कार स्वीकारून त्यांचे मुखेड येथे दिनांक ३१ रोज गुरुवारी येणार असल्याने त्यांचा मुखेड तालुक्याच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आ. हणमंत पाटील बेटमोगरेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अविनाश घाटे, तालुका अध्यक्ष भाऊसाहेब पा. मंडलापुरकर,प्रदेश सचिव डॉ.श्रावण रॅपनवाड, शहराध्यक्ष नंदकुमार मडगुलवार, उत्तम आना चौधरी,दिलीप कोडगिरे,उत्तम चव्हाण,सोनटक्के यांच्या सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी गणपत गायकवाड,शिवाजी गेडेवाड,उत्तम चव्हाण यासह अनेक मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष हनुमंत पाटील बेटमोगरेकर हे म्हणाले की लोहबंदे हे हाडाचे कार्यकर्ते असून हा पुरस्कार तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे.सामान्य जनतेची सेवा त्यांचे दुःख दूर करण्याचे काम दशरथराव लोह बंदे यांनी केले. याची दखल घेत यशदा या संस्थेने पुरस्कारासाठी निवड केली.हा पुरस्कार त्यांना दुबई येथे देण्यात आला.
परदेशात पुरस्कार मिळवणारा हा एकमेव कार्यकर्ता आमच्या तालुक्याचा आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.त्यांना असेच पुरस्कार मिळत राहो अशी सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.लोहबंदे यांनी दुबई येथील माहिती सांगताना पाच किलोमीटर अंतर प्रवास केल्यानंतरही एक काडी डबी भरेल एवढा कचरा मिळणार नाही.या देशामध्ये बाराशे किलोमीटर फिरल्यानंतर मला शेळी,गाय, यासह कुठलेही जनावर दिसले नाहीत.असे म्हणत सर्वांनी जो माझा सत्कार केला त्यांच्या ऋणात मी राहीन अशी ग्वाही दिली. यावेळी त्यांच्या सत्कारासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती .