अधिकारी आणि गुत्तेदारांच्या उदासीनतेमुळे १४ वर्षांपासून काम रखडले
नांदेड/नायगाव| तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्यकाळात मराठवाडा पँकेज अंतर्गत २००८ मध्ये नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील कोकलेगाव येथील पुलाला मंजुरी मिळाली. नंतर मराठवाडा पँकेज बारगळल्याने वेळोवेळी अर्थसंकल्पात तरतुदी करत ठिगळे जोडण्याचा प्रयत्न झाल्यावरही तब्बल १४ वर्षांपासून काम रखडले आहे. मागच्या वर्षी पुन्हा ३ कोटीचा निधी मिळूनही कामात काहीही प्रगती नसल्याने यंदाच्या पावसाळ्यातही काम पुर्ण होण्याची आशा मावळली आहे. त्यामुळे नायगाव मार्गे कुंटूर व उमरी जाणाऱ्यांचे मात्र हाल होणार आहेत.
कोकलेगाव नदीवरील अरुंद व जिर्णावस्थेतील पुलाला पर्याय म्हणून नवीन पुलाचे बांधकामासाठी २००८ साली मंजुरी मिळाली. मराठवाडा पँकेजमधून तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कामसाठी निधीची तरतूद केली होती. मात्र नंतर मराठवाडा पँकेजच बारगळल्याने पुलाच्या कामाचा प्रश्नही रेंगाळला. परंतु माजी आमदार वसंत चव्हाण यांनी अनेकवेळा शासनस्तरावर पाठपुरावा करुन अर्थसंकल्पात निधी मिळवून घेतला. मागच्या १४ वर्षात अनेक वेळा निधीचे ठिगळे जोडण्यात आल्यानंतरही कामला प्रगती मिळालीच नाही. विषेश बाब म्हणजे २०२१ मध्ये उर्वरीत काम करण्यासाठी ३ कोटी १३ लाखाचा निधी मिळाला तरीही कामात काहीही प्रगती नाही.
नायगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अधिकारी या कामाकडे आजपर्यंत कधीच लक्ष दिले नाहीत व आजही लक्ष देण्यास तयार नाहीत. कारण अधिकारीच पंधरा पंधरा दिवस मुख्यालयाकडे फिरकत नसल्याने कंत्राटदार कामच करायला तयार नाही. राजकीय अनास्थेबरोबरच अधिकाऱ्यांचे उदासीन धोरण आणि कंत्राटदाराची काम चलाऊ भुमिका यामुळे नव्या पुलाचे काम कासवगतीने होत असून १४ वर्षात अर्धेही काम झालेले नाही. तक्रारी झाल्या, बातम्या वर्तमानपत्रातून आल्या कि अधिकारी आणि कंत्राटदाराला जाग येते. कामाला कशीबशी सुरुवात होते महिना दोन महिणे झाले कि काम पुन्हा बंद सध्या असाच खेळ सुरु आहे.
नव्या पुलाचे काम अर्धवट अवस्थेत बंद आहे. नवीन पुलाचे काम बंद आहे तर जुण्या पुलाची मुदत कधीच संपली आहे. परंतु नाईलाजास्तव आजही नागरिकांना कालबाह्य झालेल्या जुण्याच पुलावरुन प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात तर अतिशय त्रास होतो. एखादा मोठा पाऊस आला की पुलावरुन पाणी वाहते हा मार्ग चार-चार दिवस बंद राहतो. नायगाव ते उमरी - भोकरला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असून त्याचबरोबर कु़टूर सर्कलमधील सर्वच गावे या मार्गावरच येतात. त्यामुळे त्या भागातील नागरिकांना पावसाळ्यात जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो.
एवढी वाईट अवस्था असताना आणि समाजमाध्यमातून विकासाच्या आणि मदतीच्या गप्पा मारणारे विद्यमान आमदार राजेश पवार या पुलाच्या कामाकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. एक ना अनेक कारणामुळे कोकलेगाव पुलाचे न सुटणारे कोडे निर्माण झाले आहे. या विलंबामुळे पुलाचा खर्च वाढत आहे. या साऱ्या चुकीच्या कारभाराची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत. या पुलाच्या रखडलेल्या कामासंबधी माहिती घेण्यासाठी नायगाव सार्वजनिक बांधकर विभागाचे प्रभारी उप अभियंता बारसकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
कोकलेगाव पुलाचे काम १४ वर्षांपासून रखडले आहे. या मार्गवरुन जाणारे अनेकजण पडून जखमी झाल्याच्या संताप आणणाऱ्या घटना घडल्या आहेत.तरीही कामाला काही गती मिळत नसल्याने राज्यकर्ते, सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभाराचा उत्कृष्ट नमुना म्हणून अर्धवट स्थितीत लटकलेल्या कोकलेगाव पुलाकडे पाहता येईल.