मुंबई| हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुरु असलेल्या अवैध धंद्याबाबत सन 2021 मध्ये जुगाराच्या 46 व दारुबंदीचे 78 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ग्रामस्थांकडून अवैध धंद्याबाबत प्राप्त तक्रारीवर तत्काळ कारवाई करण्यात येईल आणि त्या ठिकाणी पुन्हा अवैध धंदे सुरु होणार नाहीत. याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित पोलीस स्टेशनला देण्यात येथील असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिली.
याबाबत विधान परिषद सदस्य डॉ. प्रज्ञा सातव यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना गृहराज्यमंत्री बोलत होते.
हिंगोली जिल्ह्यातील सन 2021 मध्ये अवैध धंद्यांच्या अनुषंगाने जुगाराचे 429 व दारुबंदीचे 1060 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक हिंगोली यांच्याकडून अवैध धंद्याबाबत तक्रारी करण्यासाठी भ्रमणध्वनी प्रसिद्ध करण्यात आला असून प्राप्त होणाऱ्या तक्रारीवर स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली जिल्ह्यातील पोलिस स्टेशनकडून तत्काळ कार्यवाही करण्यात येते. गुटखा विक्री आणि वाहतुकीसंदर्भातही हिंगोली व नांदेड जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून कार्यवाही करण्यात येईल. या लक्षवेधीमध्ये सदस्य अमरनाथ राजूरकर यांनी सहभाग घेतला होता.