मराठवाड्यानेच महाराष्ट्राच्या वाड्मयाचा इतिहास समृद्ध केला -NNL

प्राचार्य डॉ. कौतिकराव ठाले-पाटील  


नांदेड|
मराठी वाड्मयाच्या आठशे वर्षाच्या इतिहासातील सुरूवातीची चारशे वर्षे मराठवाड्यातच साहित्य निर्मिती झाली. मुकुंदराज, महदंबा, संत ज्ञानेश्वर, संत रामदास, संत जनाबाई, संत नामदेव, संत एकनाथ या सर्वांनी सर्वोत्तम काव्यच नव्हे तर नव्या मूल्य जाणिवा दिल्या. मराठवाड्यातील याच लेखक, कवी, विचारवंतांनी महाराष्ट्राच्या वाड्मयाचा इतिहास समृद्ध केला, असे प्रतिपादन मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. कौतिकराव ठाले-पाटील यांनी केले. 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा, वाड्मय व संस्कृती अभ्यास संकुलाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘मराठवाड्यातील लेखन’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले हे होते. यावेळी मंचावर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, संकुलाच्या संचालिका डॉ. शैलजा वाडीकर, डॉ. अच्युत बन, उपजिल्हाधिकारी विकास माने, स्नेहलता स्वामी संयोजक डॉ. पृथ्वीराज तौर आदी मान्यवर उपस्थित होते. 

प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील पुढे म्हणाले की, १९६० च्यानंतर मराठवाड्यातील साहित्य बहरले. वा.रा. कांत व बी. रघुनाथ हे संधी काळातील उत्कृष्ट लेखक होते. हीच परंपरा पुढे नेण्याचे काम नरहर कुरुंदकर, चंद्रकांत भालेराव, तु.शं. कुलकर्णी, दत्ता भगत, सुधीर रसाळ, अनुराधा पाटील यांनी केले. आजचे मराठवाड्यातील लेखक कवी देखील अभिमानास्पद लेखन करीत आहेत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याचा उल्लेख करून ते म्हणाले की, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळेल ठाऊक नाही पण मराठी भाषा ही अभिजात आहेच. तिला कुणाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असेही त्यांनी सांगितले. 

विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी माणुसकीची जीवन मूल्य समाजात रुजली पाहिजेत. हे काम साहित्यिकांनी करावे असे आवाहन आपल्या मनोगतातून केले. भाषा संकुलाच्या संचालिका डॉ. शैलजा वाडीकर यांनी आपल्या प्रास्ताविकात चर्चासत्र आयोजना मागची भूमिका विशद केली. त्या म्हणाल्या, साहित्य हे ज्ञानाच्या सर्व शाखांशी निगडित आहे. ज्ञान हे आंतरविद्याशाखीय असते. त्यामुळे जीवनाच्या वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात काम करून आपले अनुभव मराठी भाषेतून व्यक्त करणाऱ्या लेखकांच्या साहित्यावरची चर्चा वाड्मयाला गती देईल. 

अध्यक्षीय समारोप करताना कुलगुरू डॉ. उद्धव भोसले म्हणाले की, मराठवाड्यातील लेखकांच्या साहित्यावरील चर्चासत्र म्हणजे विद्यापीठाला समाजाशी जोडण्याचा प्रयत्न आहे. डॉक्टर, अभियंता, वकील यांनी आपले अनुभव मराठी भाषेतून लिहिण्याची गरज आहे. त्यांचे अनुभव विश्व निराळे आहे. ते साहित्यातून यावे, ते म्हणाले की, इतरांनी आपल्या उणीवा सांगण्याची वाट पाहण्यापेक्षा आपणच आपले आत्मपरीक्षण करून आपल्या उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करावा. असेही त्यांनी सांगितले. 

यावेळी साहित्य अकॅडमीसाठी प्रो. हिरायान्ना यांच्या ‘कलानुभव’ या पुस्तकांचे डॉ. शैलजा वाडीकर यांनी भाषांतर केलेले पुस्तक, डॉ. अच्युत बन लिखित ‘माझ्या आयुष्याची स्मरणगाथा’ स्नेहलता स्वामी लिखित कादंबरी ‘गांधारी’ या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच या प्रसंगी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते प्रकाशक, कुंडलिक अतकरे, साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, डॉ.तेजस्विनी वाडेकर, प्रभाकर कानडखेडकर, दिगंबर कदम, डॉ. माधव जाधव, व्यंकटेश चौधरी, सुचिता खल्लाळ, अशोककुमार दवणे, पांडुरंग पुठेवाड, विरभद्र मिरेवाड, संजय बालाघाटे, डॉ. अच्युत बन, स्नेहलता स्वामी, डॉ. शैलजा वाडीकर, शिवाजी आंबुलगेकर यांचा प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. डॉ. पृथ्वीराज तौर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी