नांदेड| वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी मराठी साहित्य लेखन केले पाहिजे, डॉक्टरांकडे अनुभवाचे भांडवल खूप मोठे असते, मानवी जीवनाचा आरंभ आणि शेवट डॉक्टरांच्या समोर होतो. आनंदाचे, दुःखाचे प्रसंग त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक असतात म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील लेखकांनी त्यांच्या अनुभवाचा अविष्कार आपल्या लेखणीतून उस्फूर्तपणे करावा असे प्रतिपादन डॉ.हंसराज वैद्य यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे भाषा, वाङमय व संस्कृती अभ्यास संकुल भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘मराठवाड्यातील लेखन’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या पहिल्या सत्रातील ‘माझ्या आयुष्याची स्मरणयात्राः चर्चा आणि चिकित्सा’ या परिसंवादाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ.हंसराज वैद्य बोलत होते. याप्रसंगी अहमदनगर येथील विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ.राजेश गायकवाड म्हणाले की, डॉक्टरांच्या लेखनावर असे चर्चासत्र घडवून आणणारे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे देशातले पहिले विद्यापीठ होय.
‘माझ्या आयुष्याची स्मरणयात्रा’ हे आत्मचरित्र वैद्यकीय क्षेत्रात नव्याने प्रवेश करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल असे मत डॉ. शेख इक्बाल मीन्ने यांनी व्यक्त केले. तर डॉ. सुजाता जोशी पाटोदेकर यांनी ‘माझ्या आयुष्याची स्मरणयात्रा’ या आत्मचरित्राची सर्वांगीण चिकित्सा केली. या प्रसंगी मंचावर ‘माझ्या आयुष्याची स्मरणयात्रा’ या आत्मचरित्राचे लेखक डॉ. अच्युत बन व चर्चासत्राचे समन्वयक डॉ. पृथ्वीराज तौर यांची उपस्थिती होती.
या सत्राचे सुत्रसंचालन डॉ. पी. विठ्ठल यांनी केले तर आभार डॉ. शैलजा वाडीकर यांनी मानले. याप्रसंगी संकुलातील डॉ.केशव देशमुख, डॉ. रमेश ढगे, डॉ. दिलीप चव्हाण, डॉ. योगिनी सातारकर ,डॉ. राजेंद्र गोणारकर, डॉ. महेश जोशी, डॉ. विनायक येवले, डॉ. साहेब शिंदे, डॉ. दत्ता बडुरे यांच्यासह संकुलातील विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.