नविन नांदेड| आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत 'पर्यावरण नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन व स्वच्छ भारतासाठी विशेष वार्षिक युवक शिबीर' दिनांक 22 मार्च ते 28 मार्च 2022 दरम्यान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसर नांदेड येथे आयोजित करण्यात आले.
श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय सिडको, वसंतराव नाईक महाविद्यालय वसरणी, नांदेड आणि सामाजिक शास्त्रे संकुल स्वा.रा.ती.म.वि.नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या विशेष वार्षिक शिबीराचा समारोप समारंभ २८ मार्च रोजी उत्साहात संपन्न झाला. सदरील शिबिरात रासेयो च्या विद्यार्थ्यंनी दररोज सकाळी श्रमदानाच्या माध्यमातुन विद्यापीठाच्या परिसरातील माळावरचे दगड गोळा करणे,झाडांना आळे करणे,मल्चिंग करणे,प्लास्टिक गोळा करणे,गाजर गवत उपटणे इत्यादी कामे उत्साहाने केली.
आणि विद्यापीठ परिसर स्वच्छ करण्यात आला तसेच दररोज दुपारच्या सत्रात बौद्धिक कार्यक्रमांमध्ये अनेक तज्ञ मार्गदर्शकांनी स्वयंसेवकांना मोलाचे मार्गदर्शन केले. आज या विशेष शिबीराचा समारोप समारंभ संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संकुलाचे संचालक डॉ.घनश्याम येळणे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक डॉ.निरंजन कोर सरदार म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांना घडवीत असते. यातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होतो राष्ट्रहितासाठी स्वयंसेवक कार्य करतात.
मुलांवर आई-वडील चांगले संस्कार करतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा आदर करावा असे मत व्यक्त केले. यानंतर प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार म्हणाले की, विद्यार्थ्यांनी बोलके झाले पाहिजे तसेच त्यांनी वैचारिक मंथन केले पाहिजे. विद्यार्थ्यांकडून देश सेवाही घडावी. राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी हे सज्जन विद्यार्थी असतात असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंतराव नाईक महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी तथा विभागीय समन्वयक डॉ.साहेबराव शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. दिलीप काठोडे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी स्वा.रा.ती.म.वि.च्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.दीपक बच्चेवार, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. विवेक जोशी ,डॉ.बाबुराव जाधव, डॉ.विजय कुमार मोरे, डॉ. प्रतिभा लोखंडे, डॉ. शिवाजी शिंदे आदींची उपस्थिती होती. या शिबिराच्या समारोप प्रसंगी स्वयंसेवक हनुमान ढगे, नेहा आडे ,दत्ता पावडे, विद्या सुक्रे, रोशनी तारू, अनुष्का पोवळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले . सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजश्री चंलावार, गीता आचेवार, शेख जुनेद, जनार्धन मैठे, राजू राठोड, सेवालाल जाधव आदींनी परिश्रम घेतले.