जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शहर व जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यावर भर दिला आहे. निळा जंक्शन ते धर्माबाद असा नवीन मार्गावर राज्य शासन सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यासोबतच नांदेड शहरातील हिंगोली गेट ते देगलूरनाका मार्गे धनेगाव चौक या मार्गावर सुमारे एक हजार कोटींच्या उड्डाण पुलाचा शुभारंभ लवकरच करण्यात येणार आहे. त्या सोबतच नांदेड शहरात सुमारे 700 कोटींच्या रस्ते निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे.
ही सर्व विकास कामे सुरु असतानाच हजारो भाविकांचे भक्तस्थळ असलेल्या व विष्णुपुरी प्रकल्पाच्या तटावर वसलेल्या श्री काळेश्वर मंदिर परिसराच्या विकासाकडेही पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी विशेष लक्ष पुरविले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या परिसरातील बोटींग क्लब ॲडव्हेंचर पार्क व इतर सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी 12.25 कोटींच्या कामांना त्यांनी मान्यता दिली असून तसे प्रशासकीय आदेश जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी काढले आहेत. या 12.25 कोटी पैकी 4.62 कोटीचा निधी जिल्हा नियोजन समितीने उपलब्ध करुन दिला आहे.