भाजपाचे खा.चिखलीकर यांच्या प्रयत्नाला यश
यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा.जि प.सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा जि.प.सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळू खोमणे, भाजपा महानगर संघटन सरचिटणीस विजय गंभीरे, महानगर सरचिटणीस अशोक पाटील धनेगावकर, व्यंकटराव मोकले, भाजपा जिल्हा प्रवक्ते प्रल्हाद उमाटे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
केंद्र सरकारच्या नॅचरल गॅस प्रकल्प योजनेत नांदेड जिल्ह्याचा समावेश करण्यात यावा अशी मागणी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून केली होती. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडला हा प्रकल्प मंजूर करण्यात यावा अशी शिफारसही केंद्राकेड केली होती. गेल्या दोन-तीन वर्षाच्या कालावधीत खासदार या नात्याने तत्कालीन पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान व विद्यमान पेट्रोलियम मंत्री सरदार हरदीपसिंघ पूरी यांच्याकडे सतत पाठपुरावा करुन या प्रकल्पास मान्यता मिळवून घेण्यात आपणास यश आले आहे असे खा.चिखलीकर यांनी दावा केला आहे.
नांदेडचा गॅस पाईपलाईन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पीएमजीआरबीकडून महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीला मान्यता प्रदान करण्यात आली आहे. एमएनजीएल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकासह वरिष्ठ अधिकार्यांची एक टीम आज शुक्रवार दि. 4 मार्च 2022 रोजी नांदेड शहरात दाखल होवून प्रकल्पाला लागणार्या मुलभूत सुविधांविषयी चर्चा करुन प्रकल्पस्थळाची पाहणी केली आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आठ वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे. नांदेड शहरासह लोकसभा मतदारसंघातील 8 लाख कुटूंबियांना थेट घरगुत्ती गॅस पाईपलाईनव्दारे जोडले जाणार आहे. बुलढाणा ते नांदेड 270 कि.मी.ची मुख्य पाईपलाईन टाकण्यात येणार आहे.
नांदेड शहरासह जिल्ह्यातील तालुकास्तरापर्यंत गॅस पाईप लाईनव्दारे जोडले जाणार आहे. नांदेड गॅस प्रकल्पाच्या डिटेल फिजीबील्टी रिपोर्टच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. नांदेड शहरासह जिल्ह्यात गॅस पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर हे स्वच्छ, स्वस्त आणि पर्यावरणास अनुकूल इंधन म्हणून घरगुत्ती वापरासह औद्योगीक क्षेत्रालाही गॅसचा पुरवठा करण्यात येणार आहे. वाहन इंधन म्हणूनही सीएनजीचा वापर मोठ्या प्रमाणात सुरु करण्यासाठी जिल्ह्यात 170 सीएनजी पंपची उभारणी करण्याचा समावेशही या प्रकल्पात करण्यात आला आहे. खासदार चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयात एमएनजीएल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व त्यांच्या टीमची बैठक होवून नांदेड गॅस प्रकल्पाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.
नांदेड शहरासह जिल्ह्यात हा पॅकल्प पूर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम 8 लाख कुटूंबियांना घरगुत्ती गॅस पाईपलाईनव्दारे जोडले जाणार आहे. सिलेंडरपेक्षाही हे गॅस 20 ते 25 टक्के कमी दरात उपलब्ध होणार असून स्वस्त, सेफ, प्रदुषण मुक्त इंधन म्हणून प्रथम वापरानंतर ग्राहकांना पैसे द्यावे लागणार आहेत.नांदेड जिल्ह्यात हा प्रकल्प विकसीत करण्यासाठी वेळेत सुरुवात केले जाईल. पेट्रोल व डिझेल यासारख्या पारंपारिक ऑटो इंधनांना पर्याय म्हणून स्वच्छ, स्वस्त, पर्यावरणपूरक हरित इंधन आणि घरगुत्ती, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रातील ग्राहकांना नॅचरल गॅसचे प्रदान करणे हे एमएनजीएलचे उद्दीष्ट आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीला लायसन्स प्रदान केले आहे.त्यामुळे येत्या काळात नांदेड लोकसभा मतदारसंघात नॅचरल गॅस पाईपलाईनने जोडले जाणार असल्याचे खा.चिखलीकर यांनी सांगितले.