नांदेड| संशोधन कार्यात सर्वसामान्यांच्या सहभागातुनच सर्वांगीण विकास साधला जावू शकतो, असा विश्वास पर्यावरण तज्ञ व ज्येष्ठ पत्रकार अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केला. सुधाकरराव डोईफोडे जीवन गौरव व उत्कृष्ट राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे हे तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.उद्धव भोसले, महापौर जयश्री पावडे, दै.प्रजावाणीचे संपादक शंतनु डोईफोडे, नांदेडचे तहसीलदार किरण अंबेकर आदी उपस्थित होते.
यावेळी अतुल देऊळगावकर यांना दिवंगत ज्येष्ठ पत्रकार सुधाकरराव डोईफोडे, उत्कृष्ट राज्यस्तरीय पुरस्कार तर जीवन गौरव पुरस्काराने सेवानिवृत्त उपप्राचार्य डॉ.बालाजी कोम्पलवार यांना गौरविण्यात आले. या प्रसंगी बोलतांना अतुल देऊळगावकर म्हणाले की, जुन्या काळात विकास नेमका कोणाचा करायचा हे ठरवून संशोधन केले जायचे. आजचे संशोधन हे मुठभर लोकांच्या विकासासाठी साह्यभूत ठरत आहे. बहुसंख्य लोकांना या विकास व संशोधनाचा फारसा फायदा मिळत नसल्याचे दिसत आहे. मराठवाड्याचा विकास आणि पर्यावरण समतोलासाठी गोलमेज परिषद भरवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कुलगुरु डॉ.उद्धव भोसले यांनी अतुल देऊळगावकर आणि डॉ.बालाजी कोम्पलवार यांच्या कार्याचा गौरव करुन त्यांच्या कार्याचा विद्यापीठ परिसराच्या विकासात भविष्यात योगदान घेतले जाईल. पुरस्काराची उंची पुरस्कार प्राप्त लोकांच्या कार्यातून जाणवते, असे ते म्हणाले. महापौर जयश्री पावडे यांनी आपल्या भाषणात पुरस्कार प्राप्त बालाजी कोम्पलवार, अतुल देऊळगावकर यांच्यासह माजी खा.काब्दे यांच्या कार्याचा गौरव केला. जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून नांदेड तालुक्याचे तहसीलदार किरण अंबेकर म्हणाले की, समाजामध्ये इतरांसाठी काम करणारे काम करणारे दुर्मिळ होत चालले आहेत. आजचे दोन्ही सत्कारमूर्ती समाजासाठी अहोरात्र झटणारे आहेत. त्यांच्या कार्याचा उपयोग विकास कार्यात प्रशासनाला सहकार्य करणारे आहे. अशा कार्यक्रमातून तरुणांना प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
अध्यक्षीय समारोप करतांना डॉ.काब्दे यांनी मराठवाड्यातील विकासासाठी बुद्धीवादी लोक व लोकप्रतिनिधी एकत्र आल्यास विकासाला चालना मिळणार आहे. सिंचन व विकासाच्या मुद्यावर मराठवाडा जनता विकास परिषदेच्या मार्फत गोलमेज परिषद घेवून मराठवाड्याच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रास्ताविकात शंतनु डोईफोडे यांनी संशोधन, लेखन करुन व त्या-त्या प्रश्नांवर चळवळी उभ्या राहिल्या पाहिजेत असा दिवंगत सुधाकरराव डोईफोडे यांचा नेहमी प्रयत्न असायचा. आजचे दोन्ही सत्कार मूर्ती संशोधन, लेखन करुन प्रश्नांवर चळवळी उभ्या करणारे असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.डॉ.लक्ष्मण शिंदे यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ.किरण चिद्रावार यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ.सौ.योगीनी शिंदे, श्रीमती अस्मिता टिमकीकर यांनी गायीलेल्या साने गुरुजी लिखित ‘खरा तो एकची धर्म’ या गिताने झाली. कार्यक्रमाला शेषराव मोरे, प्रा.सौ.श्यामल पत्की, प्रवीण पाटील, द. मा.रेड्डी, प्राचार्य गोपाळराव कदम, प्राचार्य डी.यू.गवई, प्राचार्य डॉ.आर. एम. जाधव, सूर्यकांत वाणी, विजय कुरुंदकर, मिरकुटे, डॉ. शिवाजी शिंदे, प्राचार्य टी.एम. पाटील, डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, डॉ. अशोक सिध्देवाड, इनामदार, कॉ.प्रदीप नागापूरकर व नौनिहालसिंघ जहागिरदार, डॉ.राम मुनेश्वर, शंकर महाजन, सोपानराव मारकवाड, कॉ.उज्ज्वला पडलवार, प्रा.धुतमल, प्रा.सूर्यकांत जोगदंड, प्रा.संदीप गायकवाड, डी.एन.मोरे आदींची उपस्थिती होती.