कु. अपर्णा कदम यांच्या चित्रावर रंगभरण चित्रकला स्पर्धा; देगाव चाळ येथील बुद्ध विहारात चिमुकल्यांनी केली स्वच्छता
नांदेड| संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान आणि रंगभरण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करुन येथील सप्तरंगी साहित्य मंडळाने संत गाडगेबाबा यांना कृतीशील अभिवादन केले. या दोन्ही उपक्रमाला विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद मिळाला. यावेळी सप्तरंगी साहित्य मंडळाचे कोषाध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, कार्याध्यक्ष मारोती कदम, बालचित्रकार कु. अपर्णा कदम, आयोजक सुभाष लोखंडे यांची उपस्थिती होती.
येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने शहरातील देगाव चाळ येथील प्रज्ञा करुणा विहारात परिसर स्वच्छता अभियान आणि गाडगेबाबा यांच्या चित्रावर रंगभरण चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या दोन्ही उपक्रमाला विविध शाळांतील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते दीप, धूप आणि पुष्प पूजन करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर त्रिसरण, पंचशील, त्रिरत्न वंदना, भीमस्तुती गाथापठणानंतर उपक्रमास प्रारंभ झाला. चिमुकल्यांनी स्वयंस्फूर्तीने बुद्ध विहार परिसर झाडून स्वच्छ केला. त्यानंतर कु. अपर्णा कदम यांनी रेखाटलेल्या चित्रावर सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने रंगभरण चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतही विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. रमामाता आंबेडकर महिला मंडळाकडून कु. अपर्णा कदम हिचा सत्कार करण्यात आला.
सप्तरंगी साहित्य मंडळाच्या निवड समिती आणि पुरस्कार वितरण समितीच्या वतीने प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच प्रोत्साहनपर चार पारितोषिके देण्यात येणार आहेत. लवकरच एका समारंभात हे पारितोषिक वितरण करण्यात येणार असल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या उपक्रमास मंडळाचे पदाधिकारी प्रज्ञाधर ढवळे आणि मारोती कदम यांचे मार्गदर्शन लाभले. तर देगाव चाळ येथील शोभाबाई गोडबोले, सुमनबाई वाघमारे, निर्मलाबाई पंडित, चौत्राबाई चींतूरे, रेखाबाई हिंगोले, शिल्पा लोखंडे, विमलबाई हटकर, शोभाबाई पवार, धमाबाई नरवाडे, पंचशीलाबाई हटकर, संगीताबाई थोरात, शोभाबाई अमृत पवार, लक्ष्मीबाई खाडे, सुनबाई राजभोज, सखुबाई हिंगोले, नानाबाई निखाते या महिलांनी परिश्रम घेतले.