नांदेड| बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांना ज्ञान प्राप्ती होऊन ते बुद्ध झाले त्या पवित्र भूमीमध्ये भदंत पंय्याबोधी थेरो यांचे शिष्य भन्ते धम्मघोष,भन्ते चंद्रमणी ,भन्ते धम्मकिर्ती, भन्ते श्रद्धानंद यांची उपसंपदा संपन्न होणार आहे.
तसेच भदंत पंय्याबोधी थेरो यांच्यासहित त्यांचे शिष्य भन्ते धम्मघोष,भन्ते चंद्रमणी,भन्ते धम्मकिर्ती,भन्ते श्रद्धानंद ,भन्ते सुदत ,भन्ते शाक्यपुत्र, भन्ते शाक्यसिंह, भन्ते सुप्रिय, सर्वजण दहा दिवशिय विपश्यना बुद्धगयेच्या महा बोधी सेंटरमध्ये करणार आहेत. त्यासाठी तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रातील भिक्खू संघ बुद्धगयेसाठी येथून रवाना झाला. सर्वांनी शिल सदाचाराचा मार्ग अवलंबावा, विश्वातील सर्व प्राणी मात्रा विषयी मंगल मैत्री बाळगावी यामध्ये सर्वांचे कल्याण समावले आहे असे प्रतिपादन श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख व नांदेड जिल्हा भिक्खू संघाचे अध्यक्ष भदंत पंय्याबोधी थेरो यांनी यावेळी केले.
जास्तीत जास्त कायमस्वरूपी भिक्खु निर्माण करण्याचा पंय्याबोधी यांचा मानस आहे म्हणून नांदेड पासून उत्तरेस सात किमी अंतरावर खुरगाव नांदुसा ता. जि. नांदेड येथे समाजाच्या दानातून त्यांनी दीड एकर जमीन विकत घेऊन 20×50 चे बांधकाम करून त्या ठिकाणावर 24 तास चालणारे भारतील व महाराष्ट्रातील एकमेव असलेले श्रामणेर प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. सद्या त्या ठिकाणावर 10 फूट अखंड मार्बल मधील भगवान बुध्दांची मुर्ती बसवण्यात येणार आहे त्यासाठी आठ लाख रुपये खर्च येत आहे यासाठी दानशूर दानदात्यांनी आर्थिक दान देऊन सहकार्य करावे असे आवाहनही धम्मगुरू भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले आहे.