नांदेड| सामाजिक वनीकरण, वन विभाग आणि वन विकास महामंडळ या खात्यांमध्ये काम करणार्या रोजंदारी कामगारांच्या निर्मुलनासाठी प्रशासनाच्या वतीने कंत्राटी कामगार प्रथा सुरु करण्यात येत आहे. या प्रथे विरोधात कामगारांनी प्रखर संघर्ष करण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन कामगार नेते ऍड. कॉ. प्रदीप नागापूरकर यांनी केले.
नायगाव, मुखेड, धर्माबाद, कंधार, उमरी, किनवट आदी भागातील सामाजिक वनीकरण, वनविभाग आणि वनविकास महामंडळातील रोजंदारी कामगारांची व्यापक बैठक ऍड.नागापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली नरसी येथे आयोजित केली होती. यावेळी त्यांचा यशवंतराव पाध्ये राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलतांना ऍड.कॉ.नागापूरकर म्हणाले की, कायम रोजंदारीवरील कामगारांना कमी करुन कंत्राटी पध्दतीने कमी मोबदल्यात कामगारांकडून कामे करुन घेतली जात आहेत. 25-30 वर्ष काम केलेल्या कामगारांना विनाकारण कामावरुन कमी केले जात आहे. या कंत्राटी प्रथे विरुध्द शासकीय औद्योगीक कामगार संघटना व संयुक्त कृती समितीच्यावतीने 8 मार्च रोजी मुंबई येथे बेमुद्दत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात नांदेड जिल्ह्यातील वन कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी वन कामगार संयुक्त कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष कॉ.अब्दुल गफार, शासकीय औद्योगिक कामगार संघटनेचे कॉ.शिवाजी फुलवळे, कॉ.देवराव नारे, प्रकाश बैलकवाड आदींची भाषणे झाली. या प्रसंगी कॉ.मोहन झोकदार, कॉ.पिराजी घाटे, कॉ.दिगंबर झोनकल्ले, कॉ.गंगासागर वाघमारे, कॉ.शेख नईम, कॉ.रामजी सोनकांबळे, कॉ.रुपला जाधव, कॉ.यशवंत पिल्लेवाड यांच्यासह सामाजिक वनीकरण व वनविभागातील रोजंदारी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.