गावकर्यांनी मानले पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे आभार
मुदखेड| पांगरगाव येथे नवीन दोन पूल बांधकामासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी 4 कोटी 53 लाख 99 हजार रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी गांवकर्यांना दिली. हा निधी मिळाल्याबद्दल गावकर्यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे आभार मानले आहेत.
पांगरगाव येथे 22 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे पांगरगांव नदीला पूर आला होता. त्याच वेळी शेतकरी शिवाजी बेगाजी गाढे शेतातून घराकडे परतत असताना पुरात वाहून गेले. या घटनेने तालुकाभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याच दरम्यान नदीवर पुलाचे काम मंजूर करुन त्याचे काम लवकर सुरु करावे अशी मागणी गावकरी, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केली होती.
शनिवारी शिवाजी गाढे कुटुंबियाची भेट घेऊन सांत्वन करण्यासाठी गोविंदराव शिंदे नागेलीकर पांगरगावला गेले होते. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नवीन पूल बांधकाम करून देण्यासाठी मंजुरी दिली असून यासाठी निधीही मंजूर केल्याची माहिती गावकर्यांना दिली. या वेळी मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उद्धवराव पवार, जि.प. सदस्या प्रतिनिधी तथा संचालक भीमराव पा. कल्याणे, उपसभापती आनंदराव गादीलवाड, मुदखेड शहराध्यक्ष माधवराव कदम, डॉ. माणिकराव जाधव, नगरसेवक चांदू चमकुरे, संचालक साहेबराव मोरे, संजय कोलते, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, चेअरमन, सदस्य, मंडळधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, गांवातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
