बहुजन टायगर युवा फोर्स पदाधिकारी व कलावंतांचे स्वतःच्याच घरी आत्मक्लेष आंदोलन.
हिमायतनगर। कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामूळे कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम नसल्याने संकटात असलेला लोकपारंपारिक कलावंत प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे अद्यापही आर्थिक मदतीपासून वंचितच असल्याने याबाबतची प्रक्रिया तातडीने व्हावी व जिल्हास्तरावरील मान्यवर वृद्ध साहित्यिक व वृद्ध कलावंत मानधन निवड समितीच्या रिक्त जागा भरुन गत दोन वर्षांपासून प्रलंबित तसेच नव्याने मानधनांचे प्रस्ताव मागवून मंजूर करावेत यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यस्मरण दिनी आज बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार मा.भवरे यांच्या नेतृत्वाखाली आत्मक्लेष आंदोलनात आपल्या स्वतःच्याच घरी जिल्हाभरासह पोटा,वडगांव परिसरात व हिमायतनगर तालुक्यात कलावंतांनी आपल्या कुटूंबियांसह शेकडोंच्या संख्येने सहभाग नोंदविला असून विविध सामाजिक व राजकीय पदाधिकाऱ्यांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे.सोबतच, महाराष्ट्र शासन व नांदेड जिल्हा परिषद प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास आगामी काळात तिव्र जनांदोलन उभारणार असल्याचेही अनेकांनी सांगितले.
कोरोना उपाययोजना निर्बंधामूळे राज्यभरात सर्वच सांस्कृतिक कार्यक्रम,उपक्रम बंद असल्याने लोकपारंपारिक कलावंत व त्यांच्या कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.सातत्याने विनंती, आंदोलनानंतर यासाठी अर्ज मागणी सुरु असून त्यानंतर छाननी व निवड होणार आहे. सदरची प्रक्रिया अत्यंत संथगतीने होत असल्याने लोककलावंताची उपेक्षाच होत आहे.त्यातच,नांदेड जिल्हा परिषदेच्यास्तरावर गत दोन वर्षांपासून कलावंतांच्या मानधनांचे प्रस्ताव प्रलंबित असल्याने त्यात भर पडलेली आहे.या प्रलंबित प्रस्तावांच्या मंजूरीसाठी जिल्हास्तरीय मान्यवर वृद्ध कलावंत व साहित्यिक मानधन निवड समीतीचे पुनर्गठन जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांनी केलेले नसल्याचे कारण जिल्हा परिषद नांदेड व त्यांच्या समाजकल्याण विभागाकडून प्रारंभी सांगण्यात येत होते.पाठपुराव्याने दि.६ सप्टेंबर २०२१ रोजी समितीचे पुनर्गठन झाले.मात्र तातडीने प्रक्रिया झाली नाही.त्यातच, समितीचे अध्यक्ष राजेश्वर किवळेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तर,अन्य एक समिती सदस्य माणिक बारोळे यांचे दि.१६ सप्टेंबर रोजी निधन झाले.
त्यामुळे उपाध्यक्ष व उर्वरीत सदस्यांच्या सहकार्याने पुढील प्रक्रिया राबविणे अत्यावश्यक होते.मात्र जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने समिती अध्यक्ष व एका मयत सदस्य यांच्या रिक्त जागांचे कारणाखाली पूनश्च उदासिनता दाखविल्याने गत दोन वर्षात मानधन दूरच चक्क निवड प्रक्रियाच रखडल्याने नांदेड जिल्हाभरातील लोककलावंताना आर्थिक हाल सोसावे लागत असल्याने कोविड-१९ काळातील आर्थिक मदतीची प्रक्रिया राबवून लोककलावंतांना तातडीने आर्थिक मदत द्यावी तसेच, जिल्हास्तरावरील मान्यवर वृद्ध कलावंत व साहित्यिक मानधन निवड समितीतील दोन्ही रिक्त पदांचा भरणा करुन नव्याने समिती पुनर्गठित करुन त्यांचेकडून जिल्ह्यातील कलावंत आदींचे मानधनाचे प्रलंबित तसेच,नव्याने या वर्षासाठीचेही प्रस्ताव मागवून त्यांना मंजुरी देण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी बहुजन टायगर युवा फोर्सच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरुच असून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा,जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.मंगाराणी अंबुलगेकर आदींसह प्रशासनास यापूर्वी कळवून कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक निर्बंधांमध्ये कोविड-१९ च्या अनुषंगाने उपाययोजना म्हणून शासन निर्देशाचे पालन करुन स्वतःच्या घरीच आत्मक्लेष आंदोलनाचा ईशारा देण्यात आला होता.
परंतू,या मागणीकडेही नित्याप्रमाणेच दूर्लक्ष झाले.त्यामुळे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यस्मरण दिनी आज दि.३० जानेवारी २०२२ रोजी त्यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,प.पु.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व त्यांना वंदन करुन बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार मा.भवरे यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या आवाहनानुसार जिल्हाभरासह व हिमायतनगर तालुक्यातील पोटा बु.व खु.,वडगांव,हिमायतनगर, कामारी,सरसम बु.,दरेसरसम, कौठा तांडा, सिरंजणी, दुधड, वाळकेवाडी आदी अनेक गांव व वाडी-तांड्यातील लोककलावंत व विविध सामाजिक संघटना तसेच, राजकीय पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा देत आपल्या कुटूंबियांसह शेकडोंच्या संख्येने आत्मक्लेष आंदोलन केले. यावेळी अनेक कलावंतांनी आपल्या कला घरीच सादर केल्या.
या आंदोलनात पत्रकार अनिल मादसवार,पांडुरंग मिरासे,डॉ. मनोज राऊत,पोटा येथील परमेश्वर वालेगांवकर, शिवाजी डोखळे,लक्ष्मीबाई मिरासे,सुरेखा डोखळे, कु.भाग्यश्री डोखळे, सुनंदा मेंडेवाड,नागोराव मेंडेवाड,लक्ष्मीबाई वालेगांवकर, शाहिर जळबा जळपते,प्रकाश कदम,आनंदा जळपते,लक्ष्मीबाई जळपते,शाहिर अविनाश कदम, सुरेखाबाई माने,बालाजी डोखळे,नागनाथ वच्छेवाड, नंदाबाई वाटोळे,सरसमचे शाहिर सुर्यकांत खिराडे,सुभाष गुंडेकर, भारत कांबळे,रमेश कांबळे,शाम खिराडे,शेख खय्युम सोनारीकर आदींसह अनेकांनी सहभाग घेऊन स्वतःच्या घरीच आत्मक्लेष आंदोलन केले.