खतांचा पुरवठा त्वरित करा, अन्यथा भाजपच्या वतीने जनआंदोलन- संदीप केंद्रे

किनवट| ‘शेतकर्‍यांना थेट बांधावर खत देऊ’ ही राज्य सरकारची घोषणा फसवी ठरली आहे. ऐन खरीप हंगामात शेतकर्‍यांना युरिया व तत्सम खते उपलब्ध होत नसल्याने, शेतकर्‍यांची हेळसांड होत आहे. या विरोधात भाजपच्यावतीने लवकरच आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
 
यासंदर्भात माहिती देताना केंद्रे म्हणाले की, सन 2020 या वर्षाच्या सुरवातीपासूनच शेतकर्‍यांना विविध समस्यांनी ग्रासले आहे. आधी अतिवृष्टीनंतर कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने फळ,भाजीपाला उत्पादक  शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर पावसाने मारलेली दडी, तर पेरलेल्या सोयाबीनचे बियाणे बोगस निघाले. त्यामुळे आधीच आर्थिक कोंडीत असलेल्या  शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागली. विविध समस्यांचा सामना करीत शेतकर्‍यांनी खरीप हंगामातील  पीक जगवले. आता शासनाच्या दिरंगाई व निष्क्रीय प्रशासनामुळे शेतकर्‍यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शेतकर्‍यांचे कैवारी म्हणवून घेणार्‍या महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांना थेट बांधावर बियाणे, खत देण्याची वल्गना केली; परंतु प्रत्यक्षात ही योजना फोल ठरली आहे. ऐन हंगामात शेतकर्‍यांना युरिया व इतर रासायनिक खतांसाठी खेटे घालावी लागत आहेत. शासनाने युरिया खताचा त्वरित पुरवठा करावा, अन्यथा शासनाविरुध्द मोठे जनआंदोलन करण्याचा इशारा  संदीप केंद्रे यांनी दिला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी