स्थानिक तलाठी मंडळ अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष
हिमायतनगर, अनिल नाईक| तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावरील धानोरा, एकंबा, कोठा, वारंगटाकळीच्या रेती पेंडावरून तराफ्याच्या सहाय्याने रेती माफियांनी रेतीच्या चोरीचा धंदा सुरु केला आहे. या प्रकाराकडे या भागाचे मंडळ अधिकारी, तलाठी यांनी अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे शासनाच्या कोटयवधींचा महसूल बुडत आहे. हि बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ विपीन यांनी तातडीने येथील रेती घाट परिसरात असलेल्या रेतीचे ढिगारे जप्त करून माफियांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरीकातून केली जात आहे.
नुकतेच शासनाने हिमायतनगर तालुक्यातील ७ रेतीघाटाचे लिलावास मंजुरी दिली आहे, यास १५ दिवस लोटले तरी अद्यापही एकही रेतीघाटाचा लिलाव झाला नाही. त्यामुळे लिलावासाठी मंजूर झालेल्या रेतीघाटासह रेती तस्करांनी आपल्या सोसींसाठी निर्माण केलेल्या रेती घाटावरून रेतीच्या चोरीचा धंदा राजकीय नेत्यांच्या आशीर्वाद आणि नायब तहसीलदार, तलाठी मंडळ अधिकाऱ्याच्या संगनमताने सुरु केला आहे. त्यामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत असून, लिलावाला उशीर झाला तर रेती संपल्यानंतर कोणीही रेती घाटाचा लिलाव घेण्यासाठी पुढे येणार नाही. त्यामुळे महसूलच्या वरिष्ठानी या बाबीकडे जातीने लक्ष देऊन चोरीच्या मार्गाने बिहारी मजुरांमार्फत काढण्यात येणाऱ्या रेती तस्करांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी होत आहे.
हिमायतनगर तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर विकास कामे आणि खाजगी इमारती व शासकीय इमारतीचे बांधकाम सुरु आहेत, यासाठी रेतीची आवश्यकता असून, हीच संधी लक्षात घेऊन हिमायतनगर, धानोरा, वारंगटाकळी, एकंबा, पळसपूर, बोरगडी, येथील काही ट्रैक्टर, टिप्पर चालकांनी अल्पावधीत मालामाल होण्यासाठी रेतीचा धंदा निवडला आहे. या धंद्यात यश मिळावं म्हणून महसूलच्या अधिकाऱ्यांना महिनेवारी आर्थिक देवाण घेवाण करून रात्रंदिवस पैनगंगा नदीतून तराफ्याच्या मधुमातून पाण्यातील रेतीचा उपास करून गरजूना विक्री करण्याचा फंडा सुरु केला आहे. एवढेच नाहीतर काही नंबर नसलेली वाहने वापरून अव्वाच्या सव्वा दराने रेतीचा धंदा करत आहेत. तर रेती घाटाचे लिलाव होणार असल्याने तत्पूर्वी रेती काढून साठवणूक करण्यावर भर दिला आहे. पैनगंगा नदीकाठावरील आजूबाजूच्या अनेक रानशिवारात व गावाजनिक साठेबाजी करून शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे. एवढेच नाहीतर तालुक्यातील टाकाराळा, पिंपरी, घारापूर, पळसपूर, गांजेगाव, दिघी, विरसनी घाटावरून देखील रेतीचा अवैध्यरित्या उपसा केला जात आहे.
हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठी आसलेल्या धानोरा, एकंबा, कोठा, वारंगटाकळी घाटावरून बिहारी मजुरांच्या माध्यमातून तराफे लावून, बिहारी मजुरांच्या साहाय्याने रेतीचे उत्खनन व साठेबाजी केली जात आहे. या संदर्भात संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी याना विचारणा केली तर कुठेच रेती काढली जात नाही, असे सांगून हात झटकण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी हे त्यां रेतीमाफियांना अभय देत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे काल दि.१२ फेब्रुवारी रोजी काही पत्रकारांचा टीमने प्रत्यक्ष पैनगंगा नदीकाठावरून जाऊन पाहणी केली असता नदी पात्रात रेती काढणाऱ्या मजुरांनी नदीपात्रात तराफे सोडून धूम ठोकली. आणि याच ठिकाणी काढण्यात आलेल्या रेतीचे मोठे ढिगारे दिसून आल्यानंतर त्या सबंधीचे छायाचित्र उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांना पाठविली आहेत. त्यावरून नदीकाठावरील सर्वच रेती घाटाच्या संदर्भात कठोर निर्णय घेऊन लवकरात लवकर लिलाव करू आणि रेती माफियांच्या मुसक्या आवळू असे आश्वासन त्यांनी दिले आहे. यानंतर हिमायतनगर तालुक्यातील रेतीमाफियावर काय कार्यवाही होते याकडे पर्यावरण प्रेमी नागरिकांसह, तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागून आहे.