नांदेड, अनिल मादसवार। श्री क्षेत्र काळेश्वर हे नांदेड जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असून या क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्याकडे माझे विशेष लक्ष आहे. काळेश्वर मंदिर परिसर विकासासाठी राज्य शासनाकडून 196 काेटी रुपये मंजूर केले असून या निधीतूनच तब्बल 154 काेटींचा मुंबई सी-लिंकसारखा पूल बांधण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज येथे दिली.
डाॅ. शंकरराव चव्हाण व कै.सौ. कुसुमताई चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने नांदेड दक्षिणचे आ. माेहनअण्णा हंबर्डे यांनी डाॅ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईंकांसाठी अन्नदान कार्यक्रम आयाेजित केला हाेता. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बाेलत हाेते. व्यासपीठावर धुळे येथील उद्याेजक किशाेरअप्पा पाटील, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, विधान परिषद प्रतोद आ. अमरनाथ राजूरकर, आ. माेहनअण्णा हंबर्डे, जि. प. सदस्या डाॅ. मीनलताई खतगावकर, नगरसेवक बालाजीराव जाधव, प्रवक्ते संताेष पांडागळे, तालुकाध्यक्ष अॅड. निलेश पावडे, पं. स. सदस्य श्रीनिवास माेरे, परमेश्वर पवार, धाराेजी हंबर्डे, राहुल हंबर्डे यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
ना. चव्हाण पुढे म्हणाले, की काळेश्वर येथील महादेव मंदिरात श्रावण महिना असेल किंवा महाशिवरात्र असेल अशा वेळी माेठ्या प्रमाणात भाविक येत असतात. एकेरी रस्ता असल्यामुळे वाहतुकीची कोंडी हाेत असते. यावर मार्ग काढण्यासाठी शासनामार्फत गाेदावरी नदीवर मुंबईच्या सी-लिंकच्या धर्तीवर 145 काेटींचा पूल उभारण्यात येणार असून विष्णुपुरीतून प्रवेश केलेला भाविक दुसऱ्या मार्गाने या पुलामुळे नांदेडकडे जाऊ शकताे.
नांदेड दक्षिणमध्ये माेहनअण्णा हंबर्डे यांचे काम अतिशय चांगले आहे. एक चांगला आमदार मिळाल्यामुळे मीसुद्धा सढळ हाताने राज्य शासनाकडून त्यांना निधी मिळवून देत आहे. समृद्धी महामार्गामुळे या भागाचा कायापालट हाेणार आहे. विष्णुपुरी परिसरात डाॅ. शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे विद्यापीठ, अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय आदी शैक्षणिक संस्थांचे जाळे उभारले आहे. त्यामुळे या भागात एज्युकेशनल हब तयार झाले आहे.
यावेळी बाेलताना आ. अमरनाथ राजूरकर म्हणाले, की डाॅ. शंकरराव चव्हाण यांनी नेहमीच गाेर-गरीब व सामान्य माणसांचा विचार केला. सत्तेत असताना ते त्यांच्या संस्थेमार्फत एखादे खासगी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालय सहज आणू शकले असते. परंतु, तसे न करता त्यांनी या जिल्ह्यातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी शासकीय महाविद्यालये आणले. त्याचीच फलश्रुती म्हणून आज विष्णुपुरीमध्ये शैक्षणिक संकुलाचे जाळे उभारले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा बँकेचे संचालक शिवराम लुटे यांनी केले. आ. मोहनअण्णा हंबर्डे यांनी आयाेजित केलेल्या या अन्नदानात पाच हजारांपेक्षा अधिक गरजूंनी भाेजनानंद घेतला.