टाकराळा ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशी दडपण्याचा प्रयत्न -NNL

तक्रारदार वामनराव पाटील वडगावकर, भाजप युवा मोर्चा तालुका सरचिटणीसनी केला आरोप


हिमायतनगर|
तालुक्यातील टाकराळा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वडगाव खु, मानसिंग तांडा, लहान तांडा, या गावात ग्रामपंचायतींमार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतुन सन २००६-०७ ते २०२०-२१ पर्यंत यंत्रणेमार्फत संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी विविध विकास कामे ज्यात दुतर्फा वृक्ष लागवड, रोपे लागवड, जी.बी. मातीचे बांध, वैयक्तिक शेततळे, शौचालय बांधकाम, सिंचन विहीर, विहीर पुनर्भरण, पांदण -शिव रस्ते मग्रारोहयोच्या कामात संबंधितांनी खोटे दस्तावेज तयार करून एमबीला कैशबुकला खोटे मजूर दाखवून दरवर्षी लाखो रुपयाच्या शासकीय निधीचा गैरवापर केला आहे. त्या प्रत्येक कामाचे गावातील संपूर्ण लाभार्थी सह निधीची एक विशेष चौकशी समिती पथक औरंगाबाद व नांदेड मार्फत जायमोक्यावर जाऊन प्रत्यक्ष तक्रारदारसमक्ष खातेनिहाय चौकशी करण्यात यावी. या मागणीसाठी दि.१६ सप्टेंबर २०२१ रोजी उपोषण करण्यात आले. त्यावेळी ३० दिवसात चौकशी केली जाईल असे आश्वासन लेखी देण्यात आल्याने तक्रारदार यांनी उपोषण मागे घेतले. यास ३ महिन्याचा कालावधी लोटला तरी चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी थातुर माथूर चौकशी करून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालू केला असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. या प्रकारांची नियमानुसार चौकशी झाली नाहीतर या विरोधात पुन्हा आंदोलन, उपोषण करण्यात येईल याची चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांनी  नोंद घ्यावी असा इशारा वामनराव पाटील वडगावकर, भाजप युवा  मोर्चा  तालुका सरचिटणीस यांनी दिला आहे.


याबाबत दिलेल्या निवेदनानुसार सविस्तर असे कि, हिमायतनगर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील मौजे टाकराळा ग्रामपंचायत अंतर्गत वडगाव खु, मानसिंग तांडा, लहान तांडा, या गावाचा गटग्रामपंचायतीत समावेश आहे. या ग्रामपंचायतींमार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सण २००३-२००७, २००७-२२०८, २००८-२००९, २००९-२०१०, २०१०-२०११, २०११-२०१२, २०१२-२०१३, २०१३-२०१४, २०१४-२०१५, २०१५-२०१६, २०१६-२०१७, २०१७-२०१८,२०१८-२०१९, २०१९-२०२०, २०२०-२०२१ वर्षांमध्ये मग्रारोहयो मार्फत शेततळं, विहीर पुनर्भरण, मातीचे बांध (जीबी) दुतर्फा वृक्ष लागवड, रोपे लागवड, सिंचन विहीर, शौचालय बांधकाम, पांदण -शिव रस्ते मजबुतीकरण आदी कामामध्ये पंचायत समितीतील मग्रारोहयो विभाग हिमायतनगर येथील सहाय्यक कार्यक्रमाधिकारी मग्रारोहयो विभाग पंचायत समिती यांचेकडून रितशीर तांत्रिक मान्यता व प्रशाकीय मान्यता क्रमांक व दिनांक घेऊन संबंधित ग्रामपंचायतीने विविध कामामध्ये प्रत्यक्षात गट क्रमांक/सर्वे नंबर, लाभार्थ्यांची नावे बोगस दाखवून तसेच प्रोसिडिंग बुकातील बोगस ठराव घेऊन एकाच कुटुंबातील पती-पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, नातं-नातू, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन चालू असताना विविध योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

वरील प्रत्येक कामामधील एम.बी. बुकला कामाची खोटी नोंद दाखवून लाखो रुपयांचे बिलेउचलण्यात आली आहेत. याकडे गटविकास अधिकारी पंचायत समिती हिमायतनगर, तहसीलदार हिमायतनगर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, मग्रारोहयो विभाग पंचायत समिती हिमायतनगर, यांनी प्रत्येक कामाची जायमोक्यावर न जाता केवळ सांगण्यावरून लाखो रुपयाची देयके (बिले) संबंधिताला आरटीजीएस पावती ऑनलाईन द्वारे देण्यात आली आहेत. त्या कामावरील इस्टिमेट, वर्क ऑर्डर, एम. बी. बुक, हजेरी बुक, जॉबकार्ड बुक, वेळोवेळी देण्यात आलेले कैश बुकाची सीसी/बिले प्रोसिडिंग बुक ठराव, मस्टर बुक, हजेरी रजिस्टर, कामावरील मुकादम, ग्रामरोजगार सेवक, संपूर्ण अभिलेख्याची एका विशेष यांत्रिक समिती पथकामार्फत तक्रारदार समक्ष चौकशी करून दोषींवर निलंबनाची कार्यवाही करावी. या मागणीसाठी दि.१६ सप्टेंबर २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर बेमुदत आमरण उपोषण सुरु करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांनी मागणीनुसार येत्या ३० दिवसात चौकशी करण्यात येईल त्यामुळे उपोषण मागे घेण्याची विंनती केली होती.

त्यांच्या विनंतीला मन देऊन उपोषण मागे घेतले गेले, त्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली. परंत्तू चौकशी समितीने सुरुवातील चौकशीचा फार्स चालविला आणि यासाठी केवळ वेळ मारून नेण्याचे काम केले आहे. एवढेच नाहीतर चौकशीच्या नावाखाली आपले चांगभले करून घेत चौकशी अहवाल देण्यास टाळाटाळ केली आहे. त्यावरुन टाकराळा ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीत गोलमाल करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न संबंधित अधिकाऱ्यानी चालविला असल्याचा आरोप तक्रारदार वामनराव पाटील वडगावकर, भाजप युवा मोर्चा तालुका सरचिटणीस यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. या प्रकारांची योग्य चौकशी न झाल्यास यानंतर पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले जाईल असे सांगितले आहे.या संदर्भात अधिक माहितीसाठी गटविकास अधिकारी आंदेलवाड यांचेशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी