पीक नुकसानीपोटी ९७३ कोटी विमा मंजूर -NNL


पुणे|
खरीप पिके घेताना ‘मध्य हंगामात प्रतिकुल परिस्थितीमुळे ३९ लाख शेतकरी अडचणीत आले आहेत. पंतप्रधान पीकविमा योजनेतील विमाहप्ता परतावा पोटी राज्य शासनाने ९७३ कोटी रुपये मंजूर केल्याने या शेतकऱ्यांना विमा परतावा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

राज्यातून ८३ लाख ८७ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेच्या खरीप हंगाम-२०२१ करिता विमाहप्ता भरला आहे. कृषी आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार, खरिपात अनेक भागांत पावसातील खंड पडला होता. त्यामुळे काही भागांत पिकांच्या सरासरी उत्पादकतेत ५० टक्‍क्‍यांहून अधिक घट येण्याची शक्यता होती. विमा योजनेत या स्थितीला ‘मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती’ (मिडसीझन अॅडर्व्हसिटी) असे म्हटले असून भरपाईदेखील दिली जाते. मात्र अशी स्थिती उद्‍भवल्याची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी जारी करणे आवश्यक असते. यंदा २२ जिल्ह्यांमध्ये अधिसूचना जारी झाल्या होत्या.

‘मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती’ जाहीर झाल्यानंतर अर्थात जिल्हाभर सरसकट विमा भरपाई सर्व शेतकऱ्यांना देण्याची तरतूद नाही. “अधिसूचना जारी झालेल्या अधिसूचित महसूल मंडळातील अधिसूचित पीक उत्पादक शेतकऱ्यांना त्याचे लाभ मिळतात. अशा मंडळात विमा संरक्षित रकमेच्या २५ टक्के रक्कम आगाऊ नुकसानभरपाई म्हणून विमा कंपनीनी तत्काळ द्यावी लागते. मात्र राज्य शासनाने विमा अनुदानाचा पहिला हप्ता विमा कंपनीला दिला असेल तरच ही भरपाई द्यावी, अशीदेखील अट आहे. त्यामुळे शासनाने असा हप्ता आता अदा केल्याने शेतकऱ्यांना भरपाई मिळू शकणार आहे,” असे आयुक्तालयाचे म्हणणे आहे.

आठवड्यात भरपाई बँक खात्यात शक्य... :- मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे म्हणाले, मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीच्या छायेत यंदा २७ लाख हेक्टर क्षेत्र होते. त्याचा फटका ३९ लाख शेतकऱ्यांना बसलेला आहे. राज्य शासनाने अनुदानाचा पहिला हप्ता दिल्याने शेतकऱ्यांच्या थेट बॅंक खात्यात येत्या आठवडाभरात भरपाईच्या रकमा संबंधित विमा कंपन्यांकडून जमा होऊ शकतात. या रकमेचा वापर येत्या रब्बीसाठी करण्याकरिता शेतकऱ्यांना उपयोग होऊ शकेल.

“विमा कंपन्यांना देय असलेल्या पहिल्या हप्त्यापोटी रुपये ९७३ कोटी १६ लाखाचे अनुदान राज्य शासनाने वितरित केले आहे. ते विमा कंपन्यांना तात्काळ देण्यात येईल. यामुळे मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती जाहीर झालेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना २५ टक्के नुकसान भरपाई रक्कम मिळू शकणार आहे.” - धीरज कुमार, कृषी आयुक्त

सौजन्य : अॅग्रोवन, दिनांक : 02-Oct-21 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी