माहूर| साडेतीन शक्तीपिठांपैकी एक पीठ असलेल्या रेणुका माता देवी संस्थांच्या पुढाकारातून आज गुरूवारी शासनाच्या नियमांचे पालन करून नवरात्रोत्सवास अश्विन शुद्ध प्रतिपदेला ‘उदे ग अंबे उदे’ च्या गजरात सुरुवात झाली आहे.
पहिल्या माळेची पूजा सकाळी ०७ वाजता अभिषेकांचे सहस्त्र आवर्तन मुख्य देवता रेणुका मातेच्या वैदिक महापूजेने प्रारंभ झाला. रेणुकामातेच्या मुख्य गाभाऱ्यातील परिसरात परिवार देवता श्री तुळजाभवानी मंदिर, श्री परशुराम मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिरात एका दगडाच्या कुंडात मातृका भरुन त्यात धान्य टाकून कुंडावर मातीची कलश आणि नागवेलीची पाने, श्रीफळ, सभोताल पाच उसाचे धांडे उभारुन कलशावर पुष्पहार पहिली माळ चढवून विधिवत घटस्थापना करण्यात आली. यावेळी संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तथा नांदेडचे प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश के. एन. गौतम, सहायक जिल्हाधिकारी तथा पदसिध्द सचिव किर्तीकिरण पुजार यांच्या हस्ते कुमारीका पूजन करण्यात आले.
यावेळी पुजारी भवानीदास भोपी, चंद्रकांत भोपी, संजय काण्णव यांच्या हस्ते सिंगार, अलंकार करून पिवळ्या रंगाची पैठणी महावस्त्र परिधान करण्यात आले. ११.३० वाजता न्यायाधीश के. एन. गौतम आणि किर्तीकिरण पुजार यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यानंतर छबिना मिरवणूक काढून परिसरातील परिवार देवतांची पूजा नैवेद्य व आरती पूजन करण्यात आले. प्रतिपदेपासुन दशमीपर्यंत मंदीरात अखंड देवीसमोर नंदादीप तेवत ठेऊन दरोरोज पायास म्हणजे दही भात, पुरणपोळीचा नेवैद्य, आरती करून माहूरगडावर नवरात्र महोत्सवास प्रारंभ झाला. दरम्यान गडावर आणि मंदिर परिसरात पोलीस विभागाने बंदोबस्त तैनात करण्यात आला. यावेळी भाविकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करत मातेच्या दर्शनाचा लाभ घेतला आहे. तत्पूर्वी भाविकांना दर्शनासाठी ऑनलाइन व ऑफलाइन पासशिवाय दर्शन मिळणार नसल्याने भाविकांची गर्दी ही नियंत्रणात असल्याचे दिसून आले.