भाषा संकुलात वाचनप्रेरणा दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन
नांदेड| पोटाचे भरणपोषण करण्यासाठी वाचन करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे, त्याच प्रमाणात मेंदूचे भरण-पोषण करण्यासाठी वाचन करणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. असे मत सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. गणेश मोहिते यांनी भाषा संकुलात व्यक्त केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे भाषा वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुल आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वाचनप्रेरणा दिनानिमित्त सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. गणेश मोहिते यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध लेखिका तथा संकुलाच्या संचालिका डॉ. शैलजा वाडीकर या होत्या. यावेळी डॉ. केशव सखाराम देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. गणेश मोहिते पुढे बोलताना म्हणाले की मेंदूचे भरण-पोषण होण्याची प्रक्रिया थंडावल्यामुळे अंधश्रद्धा आणि अविवेक वाढीस लागला आहे. लोक आंधळेपणाने सामाजिक वर्तन करत आहेत. हे थांबण्यासाठी नेमके काय वाचावे? व कसे वाचावे? याचे प्रशिक्षण देणाऱ्या वाचनगुरुची गरज आहे. समाजातील बुद्धिजीवी वर्गाने वाचनगुरु म्हणून पुढे आले पाहिजे व बहुजनांना मार्गदर्शन केले पाहिजे असेही डॉ. मोहिते म्हणाले.
बारा कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रामध्ये पुस्तकांची पाचशे प्रतींची आवृत्ती संपू नये हे अत्यंत निराशाजनक असून शेतकऱ्यांनी महात्मा फुले यांचा ‘शेतकऱ्याचा आसूड’ वाचलेला नसणे किंवा स्त्रियांना ताराबाई शिंदे यांचा ‘स्त्री-पुरुष तुलना’ हा ग्रंथ माहित नसणे हे समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. त्यामुळे बालवयापासूनच योग्य ते वाचनसंस्कार होण्याची गरज आहे. ज्ञान आणि माहिती यातील फरक तरुण पिढीने लक्षात घ्यायला हवा असेही डॉ. गणेश मोहिते म्हणाले.
अध्यक्षीय समारोप करताना डॉ. शैलजा वाडीकर यांनी साक्षरता, सुसंस्कार आणि वाचन यांच्या संदर्भाने मांडणी केली. भाषा संकुलात आगामी काळात विद्यार्थ्यांसाठी अभिवाचनाचे व प्रकट वाचनाचे उपक्रम राबवले जातील असे सांगितले. विद्यार्थ्यांची अभिरुची घडवण्यामध्ये वाचनाचा मोठा वाटा असतो असे त्या म्हणाल्या. या कार्यक्रमाचे आयोजन आणि सूत्रसंचालन डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले तर डॉ. केशव सखाराम देशमुख यांनी आभार व्यक्त केले. व्याख्यानास डॉ. दिलीप चव्हाण, डॉ. वैजनाथ अनमुलवाड, डॉ. योगिनी सातारकर, डॉ. रमेश ढगे, डॉ. पी. विठ्ठल यांच्यासह विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. हा कार्यक्रम दूरदृश्यप्रणालीच्या साह्याने आयोजित करण्यात आला होता.