नांदेड| वीज मंडळातील तिन्ही कंपन्यांमध्ये काम करणार्या कर्मचारी, अधिकारी, कामगारांच्या प्रलंबित सोळा मागण्या तात्काळ निकाली काढाव्यात या मागणीसाठी वर्कर्स फेडरेशन नांदेड सर्कलच्यावतीने आज विद्युत भवन कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.
चेंज ऑफ नोटीस न देता व संघटनेशी चर्चा न करता एकतर्फी बदल करण्याचे धोरण बंद करावीत, तिन्ही कंपन्यातील वर्ग एक ते चार प्रवर्गातील रिक्त पदावर तात्काळ भरती करावी, कामगार व अभियंते यांच्या पेट्रोल भत्त्यात पूर्वलक्षी प्रभावाने वाढ करून तात्काळ लागू करा, मयत कामगार वारसांना तात्काळ नोकरीत सामावून घ्यावे व ज्या कर्मचार्यांना भविष्य निर्वाह निधी क्रमांक मिळाला आहे त्या सर्वांना सी.एस-28 लागू करा, रखडलेले पदोन्नतीच्या पॅनल तात्काळ घ्या, बदली धोरण एकसमान करणे परस्पर करण्यात येणारे बदल बंद करा.
अंतर्गत भरतीची राखीव पदे तात्काळ जाहिरात काढून भरा, पगारवाढ कराराचा तिसरा हप्ता तात्काळ अदा करा, महावितरण मध्ये वसुलीच्या नावाखाली सुरू असलेले दडपशाही तात्काळ बंद करा आदी मागण्यांचे निवेदन मुख्य अभियंत्यांना यावेळी देण्यात आले. या आंदोलनाला नांदेड जिल्हा आयटकच्यावतीने कॉ.के.के. जांबकर यांनी पाठिंबा दर्शविला. या आंदोलनात कॉ. एस. एम. स्वामी, कॉ.पी.एन. तेलंग, कॉ. व्ही.जी.घोगरे, कॉ. पी.एस.घुगे, कॉ.एस.जी. निशाणकर तसेच सर्व परिमंडळ, मंडळ व विभागीय कार्यकारिणीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.