हिमायतनगरात १५ लक्ष ८० हजारांचा गुटखा एलसीबीच्या पथकाने वाहनासह पकडला -NNL

गुटख्याची साठेबाजी करून इतरत्र पुरवठा करणाऱ्या माफियांवर कधी कार्यवाही होणार 


हिमायतनगर|
गेल्या अनेक महिन्यापासून हिमायतनगर शहरात दोन गुटखा माफियांकडून गुटख्याचा गोरखधंदा राजरोसपणे चालविला जात आहे. असे असताना स्थानिक पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने हिमायतनगर शहर हे गुटखा विक्रीचे केंद्रबिंदू बनले आहे. याबाबत अनेकदा वर्तमान पात्रातून बातम्या लावल्या मात्र कार्यवाही करण्यास टाळाटाळ चालविली जात होती. दरम्यान आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हिमायतनगर शहरात तेलंगणा राज्यातून अवैद्य विक्रीसाठी वाहनातून घेऊन येणाऱ्या पिकअप वाहनसह १५ लक्ष ८० हजारांचा गुटखा पकडला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हिमायतनगर शहरातून गुटख्याचा गोरखधंदा चालू असल्याचे उघड झाले आहे. आता शहरात गुटखा माफियांकडून सिरंजनी रस्ता आणि चौपाटी भागात साठवून ठेवण्यात येणाऱ्या लाखोंच्या गुटख्याचा मालावर छापा टाकून कार्यवाही करतील का...?अशी चर्चा शहरातील नागरिक तथा व्यसनमुक्तीचे प्रचारकातून केला जात आहे.   

हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, या ठिकाणी तेलंगणा कर्नाटक राज्यातून कोट्यावधीचा गुटख्याचे कंटेनरसह माल आणला जाऊन गुटख्याची राजरोसपणे विक्री केली जात आहे. हिमायतनगर हे गुटका विक्रीचे केंद्रबिंदू असल्याने याचं ठिकाणहून विदर्भातील अनेक तालुक्याला चारचाकी वाहनातून शासनाने बंदी घातलेला गुटखा सप्लाय करून शहरातील २ गुटखा माफिया मालामाल झाले आहेत. एकेकाळी लहानश्या घरात राहणारे हे गुटखा किंग आज टोलेजंग इमारतीत वास्तव्यास असल्याने पोलिसांशी साटेलोटे करून गुटख्याच्या गोरखधंद्यातून त्यांनी लाखोंची माया जमविली असल्याचे शहरातील नागरीकातून बोलले जात आहे. यापूर्वी मागील काळात शहरात ४२ लाखाचा गुख्याचा माल ट्रकसह स्थागुशाच्या पथकाने पकडून कार्यवाही केली होती. दरम्यान माफियांनी या कार्यवाहीला विरोध करत तडजोडीचा प्रयत्न केला मात्र ऐनवेळी पत्रकार मंडळी पोचल्याने त्यांचा हा डाव फिसकला. 

तरीदेखील शहरातील गुटखायच्या धंद्याला लगाम लागली नाही, त्यानंतर काही महिन्याचा कालावधी लोटला असताना भोकर पोलिसांनी हिमायतनगर शहरातील एका गुटखा माफियांचा ६० लाखाचा गुटखा पकडून कार्यवाही केली होती. या कार्यवाहीची हिमायतनगर शहरासह जिल्हाभरात खळबळ उडाली, काही दिवस लोटले नसताना पुन्हा हिमायतनगर शहरातून गुटख्याचा गुरखधंदा पूर्ववत सुरु झाला. दरम्यान पत्रकारांनी याबाबत अनेक वर्तमान पात्रातून चौनेलच्या माध्यमातून आवाज उठविला, मात्र माफियांची पोलिसांशी असलेली हातमिळवणी गुटख्याच्या धंद्याला बळ देत होती. त्यामुळे काही गुटखा विरोधी लोकानी शहरात तेलंगणा राज्यातून पिकअप बोलेरी मधून हिमायतनगर शहरात अन्य ठिकाणी अवैधरित्या विक्रीसाठी घेऊन जाणारा गुटखा येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शोध पथकास मिळाली. 


यावरून त्यांनी पळत ठेऊन शासनाने बंदी घातलेल्या गुटखा पान मसाला घेऊन येणाऱ्या पिकअप वाहनाला हिमायतनगर - सवना रस्त्यावरील रेल्वे अंडर ब्रिजवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक परमेश्वर हानुसिंघ चव्हाण यांनी व त्यांच्या पथकाने दि.१८ रोजी सकाळी १० वाजून २० मिनिटांनी अडवून पाहणी केली. त्या पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप वाहनामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने अधिसूचना अन्वय निर्बंध घातलेल्या अन्नपदार्थाचा साठा करून विक्री करताना बाळगून वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी वाहनाला हिमायतनगर पोलीस ठाण्यात आणून तपासणी केली असता या वाहनांमध्ये एकूण १० लक्ष ८० हजार रुपयाचा अवैद्य सुगंधित गुटखा, ०४ चाकी वाहन एम एच २६ - बीइ ५७८५ किंमत ०५ लाख रुपये असा एकूण १५ लक्ष ८० हजार रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. त्यावरून वाहनचालक शे.गफ्फार शे. बाबू रा.रहीम कॉलनी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा अधिक तपास स्थागुशाचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे करत आहेत. 

या संदर्भामध्ये हिमायतनगर पोलिस ठाण्यात गुरन २४८/२१ कलम २६ (२) २७ अन्नसुरक्षा व मानके २००६ स.क. २०११ सह कलम ३० (२) (अ) ५९ (IV) व कलम १८८, २७२, २७३, ३२८, भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या गुटखा माफियांवर कोणतीही कार्यवाही न करता केवळ वाहनचालकांवर कार्यवाही करण्यात आल्याने पोलिसांच्या या दुटप्पी धोरणाबाबत नागरीकातून आश्चर्य होत आहे. या घटनेचा आज जप्त करण्यात आलेला माल हिमायतनगर पोलिस ठाण्यात ठेवण्यात आला असून, याबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर गुटख्याची खरी किंमत समोर येणार आहे. एका वाहनावर कार्यवाही झाली आता शहरात लाखों रुपयाचा गुटखा साठा करून राजरोसपणे गुटखा विक्रीचा गुरखधंदा चालविणाऱ्या अन्य माफियांच्या मुसक्या कधी आवळणार अशी चर्चा शहरातील नागरीकातून होत आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी