वाढोण्याच्या व्यंकटेश बालाजी मंदिरात ब्राम्होत्सव संपन्न; बुंदीच्या प्रसादाचे वितरण -NNL


हिमायतनगर,अनिल नाईक|
येथील आठशेहून अधिक वर्षापूर्वीच्या पुरातन कालीन भगवान व्यंकटेश बालाजी मंदिरात गेल्या ९ दिवसापासून सुरु असलेल्या ब्रम्होत्सावाच्या शेवटच्या दिवशी दि.१५ रोजी कालिंका माता मंदिरातून निघालेल्या मिरवणुकीतील भाविक भक्तांनी बालाजीचे दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घेतला आहे.

शेकडो वर्षापूर्वीचे यादव कालीन भगवान व्यंकटेश बालाजीचे मंदिर शहरातील बजरंग चौकाच्या पश्चिम बाजूस आहे. त्यानंतरच्या काळात मंदिराची दुरुस्ती झाल्यामुळे सदर मंदिर पुरातन वाटत नसले तरी मंदिरातील मुर्त्या व बांधकामाच्या दगडावरून हेमाडपंती कलेची मांडणी दिसून येते. बालाजीचे मंदिर हे पूर्वाभिमुख असून, पूर्व - पश्चिम ३३ फुट ४ इंच लांबी, तर दक्षिण - उत्तर रुंदी २७ फुट ६ इंच आहे. मंदिराचे बांधकाम ४ फुट उंचीच्या जोत्यावर करण्यात आलेले असून, मंदिराच्या उभारणीत मोठ मोठ्या दगडांच्या शिळा लावलेल्या आहेत. मंदिराचे सभामंडप ७ बाय १४ फुटाचे असून, गर्भग्रहाभोवती प्रदक्षिणा व अंतरालासाठी दोन्ही बाजूने एक एक प्रवेश द्वार ठेवण्यात आले आहे. मंदिराचे शिखर अर्धगोलाकार असून, त्यावर लहान शिखर आहे. मंदिराचे प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती कोरण्यात आलेली असून, परंपरेनुसार मंदिराची देखभाल दासागुरु वाळके यांच्या मार्गदर्शनखाली कांतागुरु वाळके आणि प्रवीण गुरु वाळके हे करत आहेत. या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी दसरा महोत्सव दहा दिवस साजरा करण्यात आला.

या मंदिरात भगवान व्यंकटेश बालाजी, विष्णू, ब्रम्हदेव, महिषासुर मर्दिनी, स्कंद कार्तिके, श्रीगणेश यासह अन्य देवी - देवतांच्या काळ्या पाषाणातील मोहक मुर्त्या स्थापित आहेत. विजयादशमी रोजी बालाजी मंदिरात हिमायतनगर येथील मानकरी सुभाष पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर संध्याकाळी शहरातून निघालेली विजया दशमीच्या मिरवणुकीतील हजारो भक्तांनी बालाजीचे दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी भक्तांना मंदिराचे पुरोहित कांतागुरु, प्रशांत वाळके यांच्या हस्ते बुंदीच्या स्वरूपात तीर्थ - प्रसाद वितरित करण्यात आले. याच मंदिरात महिषासुर मार्दीनीची मूर्ती असल्यामुळे ब्रम्होत्सव पर्वकाळात बालाजी मंदिर दर्शनाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले होते. विशेष म्हणजे उत्सव काळात स्फूर्ती महिला मंडळाच्या वतीने शारदा देवीची प्रतिष्ठापना करून नऊ दिवसाचा उत्सव साजरा केला जातो आहे. दरम्यान ब्रम्होत्सव, नवरात्र तथा दसरा उत्सव काळात विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्याच्या कान्या - कोपऱ्यातून भक्तजन दर्शनासाठी आवर्जून येतात हे विशेष. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी