पदव्युत्तर असलेल्या शेतकऱ्याची उद्विग्नता
लोहा| अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन ज्वारी पीक हातचे गेले.. पाहणी दौरे सुरू आहे.. निवेदन देणं सुरूच आहेत..आता या सगळ्या देखाव्याचा शेतकऱ्यांना उबग आलाय.. गुळगुळीत व.. तोंडाला पान पुसणारी आश्वासन नको तर थेट मदत करावी असा संतप्त भावना व्यक्त होत असतानाच विज्ञान शाखेतील पदव्युत्तर असलेल्या तरुण शेतकऱ्यांनी शेतात पाणीच पाणी...पाहून हतबलता व्यक्त केली. तहसीलदार साहेब...एसडीओ साहेब..वाळूच्या जप्त केलेली होडी (बोट) द्या ..ती माझ्या शेतातील पाण्यात फिरवितो... पर्यटन स्थळ ..करतो त्यातून ..चार पैसे तरी मिळतील अशी उद्विग्नता व्यक्त करत आपली व्यथा मांडली.
लोह्यातील विज्ञान शाखेचे पदव्युत्तर असलेले तरुण शेतकरी शहाजी पाटील पवार..ते आधुनिक शेतकरी.. कल्पक आणि हजरजवाबी म्हणून या भागात ओळख..शहरा लगत पारडी येथे यांची वडिलोपार्जित शेती..तसे हे मोठे शेतकरी.. लोह्याचे पाहिले नगराध्यक्ष माणिकराव पाटील यांचे नातू... त्यांच्या पारडीच्या शिवारात २० एकरात सोयाबीन आहे. अतिवृष्टीमुळे सगळं सोयाबीन पाण्यात... गुडघ्या इतकं पाणी...शेतात गेल्यावर हे सगळं दृश्य मन हेलावून टाकणार..लागडीवचा खर्च तर निघणार नाही.. उलट या शेतातील पाण्याचा निचरा व्हायला किती दिवस लागतील याचा कायबी नेम नाही...
त्याच दररोज होणारे पाहणी दौरे..शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारी वक्तव्य...पदरात मात्र काहीच नाही...! हे सगळं पाहून..ऐकून ..माणसं आता वैतागून गेली आहेत.. शहाजी पाटील पवार या विज्ञान शाखेतील पदव्युत्तर तरुण शेतकऱ्यांनी आपल्या वावरातील परिस्थिती डोळ्यान पहिली.. हतबलता वाढली..खचून न जाता मोठ्या हिमतीने त्यांनी ..तहसीलदार साहेब..एसडीओ साहेब.. तुम्ही जप्त केलेली होडी द्या.... माझ्या शेतात त्याची पर्यटन स्थळ करतो..जेणेकरून चार पैसे तरी मिळतील ..अशी व्यथा शहाजी पाटील यांनी मांडली. सोशल मीडियावर झालेली ही पोस्ट खूपच व्हायरल होते आहे.. स्वतःचा मोबाईल सुद्धा त्यांनी त्यात दिलाय. होडीतून मोफत सैर कोणाला केली जाणार आहे हेही नमूद केले आहे. एकंदरीत प्रशासकीय यंत्रणेची अनास्था आणि मदतीसाठी शासनाचा कंजूषपणा शेतकऱ्यांना खूपच क्लेशदायी ठरला आहे. शहाजी पाटील यांची ही मागणी या सगळ्या व्यवस्थेचा कोडगेपणा दर्शविणारा आहे .