जलसंपदा विभागाने नांदेडच्यादृष्टीने घेतलेल्या निर्णयाची दिली पत्रकार परिषदेत माहिती
नांदेड| राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. काल नांदेड येथे पोहोचताच मंत्री जयंत पाटील यांनी नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत जलसंपदा विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत मंत्री जयंत पाटील यांनी नांदेडच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले निर्णय घेतले. या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी दिली.
आढावा बैठकीत झालेले निर्णय
उर्ध्व पैनगंगा प्रकल्प हा जिल्ह्यातील मोठा प्रकल्प आहे. मात्र कालव्यांची दुरुस्ती न झाल्याने सध्या प्रकल्पात तूट निर्माण झाली आहे. या कालव्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून सर्वेक्षण करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.
गळती अधिक असलेल्या कालव्यांची दुरुस्ती महामंडळाकडे उपलब्ध असलेल्या देखभाल दुरुस्ती निधीतून केली जाईल. यामुळे नांदेड - हिंगोली - यवतमाळ जिल्ह्यातील १ लाख हेक्टर सिंचनास फायदा होणार आहे. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातंर्गत सापळी धरण न होऊ शकल्याने पाण्याची तूट निर्माण झाली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी सापळी धरणाच्या पूनर्नियोजन अंतर्गत कयाधू नदीवर खरबी बंधाऱ्यातून १०९ दलघमी पाणी वळवण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे.
पैनगंगा नदीवर गोजेगाव येथे उच्च पातळी बंधाऱ्यातून ९७ दलघमी पाणी उपसाद्वारे इसापूर धरणात वळवण्याबाबतच्या प्रस्तावावर सर्व संबंधित मंत्रालयस्तरावर आवश्यक बैठक घेऊन मान्यता देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातंर्गत इसापूर धरणात ५८२ दलघमी पाण्याची तूट निर्माण झाली असून ही तूट भरून काढण्यासाठी पैनगंगा नदीवर दिगडी उच्च पातळी बंधाऱ्यातून ५८२ दलघमी पाणी उपसाद्वारे इसापूर धरणात वळवण्याबाबतच्या प्रस्तावावर सर्व संबंधित मंत्रालयस्तरावर आवश्यक बैठक घेऊन मान्यता देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
पैनगंगा नदीवरील नवीन ६ उच्चपातळी बंधारे तसेच माहूर शहरातील पाणी पुरवठ्याच्यादृष्टीने धनोडा उच्चपातळी बंधाऱ्यांचा समावेश उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या ६ व्या सुधारित अंदाजपत्रकात करण्यात येऊन त्यास मान्यता देण्याचा निर्णय कालच्या बैठकीत घेतला. माहूर, हदगाव, हिमायतनगर, उमरखेड, या परिसरातील ५० गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
लेंडी प्रकल्प हा नांदेड जिल्ह्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली असल्यामुळे या प्रकल्पास गती देता येईल. येत्या काळात प्रकल्पातील इतर अडचणी दूर करून प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. डॉ. शंकररावजी चव्हाण यांचे विष्णुपूरी प्रकल्प येथील स्मारकाचे काम तातडीने सुरू करण्यात येईल तसेच यावर्षी १४ जुलैपासून प्रत्येक वर्षी चव्हाणसाहेबांच्या नावाने जलभूषण पुरस्कार देण्याचा कार्यक्रम घेण्यात येईल असेही जयंत पाटील यांनी सांगितले.