तलावातील गाळ घेऊन जाण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी मागणी नोंदवावी - डॉ. विपीन इटनकर - NNL


नांदेड|
धरणामधील दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे त्यातील पाणी साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट होत चालली आहे. यासाठी शासनाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवाय मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ही मोहिम घेतली असून शेतकऱ्यांनी धरणातील हा सुपिक गाळ घेऊन जाण्यासाठी मागणी नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.  

नांदेड जिल्‍ह्यात गोदावरी, पैनगंगा, मन्याड, लेंडी सारख्या मोठ्या नद्या व इतर लहान नद्या वाहतात. सिंचन सुविधेच्यादृष्टिने जिल्ह्यात अनेक ठिकाणी लहान-मोठी धरणे बांधण्यात आली आहेत. पावसाच्या असमतोलनामुळे जिल्ह्यातील काही धरणे ही कोरडी झाली आहेत. हे लक्षात घेता त्यातील गाळ काढण्याची मोहिम सुरु करण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्‍हा परिषदेअंतर्गत असलेल्या 335 तलावापैकी 94 तलाव गाळ काढणे योग्‍य आहे. या तलावात एकूण 10 लाख 44 हजार क्‍युबिक मिटर इतका गाळ आहे. तसेच जिल्‍हा जल व मृद संधारण विभागाकडे 16 तलाव असून त्‍यामध्‍ये 42 हजार 67 घनमीटर गाळ आहे. हा गाळ काढण्‍यासाठी येत्या 20 दिवसात गाळ काढणे व शेतकऱ्यांच्‍या शेतात टाकण्‍यासाठी शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन त्‍यानुसार याद्या व इतर नियोजन केले जात आहे.  

या कामासाठी मोठ्या प्रमाणात लोकसहभाग घेतला जात असून यात संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी, अनुलोम आदी संस्थांच्या माध्यमातून आतापर्यंत 12 तालुक्यातील 48 गाव / पाझर तालावातील गाळ काढण्याचे काम प्रगतीवर आहे. यातून सुमार 3.35 घनमीटर गाळ काढण्यात आलेला असून सदरचा सुपिक गाळ 271.20 हेक्टर क्षेत्रावर टाकण्यात आलेला आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात गाळ घेऊन जाण्यासाठी पुढे सरसावे व याबाबत संबंधित तालुक्यातील तहसिलदार यांच्याकडे मागणी नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.




 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी