महाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत - NNL

एसएनडीटी विद्यापीठाच्या भारतरत्न महर्षी कर्वे ज्ञान स्रोत केंद्राचा नूतनीकरण समारंभ



मुंबई| महाराष्ट्रात अनेक शैक्षणिक संस्था गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण देत आहेत.महिलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या सक्षमीकरणासाठी  एसएनडीटी विद्यापीठ वसा आणि वारसा घेऊन कार्य करत आहे ही अभिमानाची बाब आहे. एसएनडीटी विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आणि महाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबईच्या भारतरत्न महर्षी कर्वे ज्ञान स्रोत केंद्राचा ( जुहू परिसर ) नूतनीकरण समारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.सामंत म्हणाले, महिलांच्या शिक्षणाबरोबरच त्यांची सुरक्षा सुद्धा महत्वाची आहे. त्यासाठी लवकरच राज्यस्तरीय समिती गठित करण्यात येईल. विद्यार्थिनींची सुरक्षितता यासाठी आवश्यक त्या उपाययोजना संदर्भात ही समिती कार्य करेल.

या विद्यापीठाचे प्रलंबित असलेले प्रश्नही लवकरच निकाली काढून संवैधानिक पदे भरण्यास मान्यता देण्यात येईल. तसेच रत्नागिरी मध्ये एसएनडीटी विद्यापीठाचे महिला महाविद्यालय सुरू करण्यात यावे यासाठी सर्व मदत केली जाईल. दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील  विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षेची तयारी करण्यासाठी तिथे राहता यावे, स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी यासाठी राज्यातील सर्वपक्षीय खासदार यांनी मदत केली आहे, असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले. यावेळी, कुलगुरू प्रा.शशिकला वंजारी, प्र - कुलगुरू डॉ.विष्णू मगरे, रुसा प्रकल्प संचालक पंकज कुमार, प्राध्यापक उपस्थित होते.

 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी