नांदेड| कृष्णुर येथील इंडिया मेगा ऍग्रो कंपनी विरोधात आज सकाळी ११ वाजता ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत कंपनीच्या गेट समोर शेतकरी जनआंदोलन करण्यात आले.
कृष्णुर येथील इंडिया मेगा ऍग्रो कंपनी कडे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेतमाल सोयाबीन, हळद,हरबरा ,मका विक्री केला .गेल्या सहा महिण्यापासून शेतकऱ्यांना रक्कम देत नाही,कंपनी शेतकऱ्यांना योग्य,सत्य माहिती देत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात भीती तयार झाली. शेतकऱ्यांची पेरणी जवळ आली तरी पैसे भेटत नसल्यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड चिंतेत आहे. आपल्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी पुढील दिशा ठरवण्यासाठी शेतकरी कंपनीच्या गेट समोर भर उन्हात मोठया संख्येने जमले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना किसान ब्रिगेड चे मराठवाडा अध्यक्ष डॉ दत्ता मोरे म्हणाले की, चार हजार प्रति क्विंटल चे सोयाबीन आता आठ हजार रुपये झाले.कंपनीचे मालक बाहेती म्हणतात तुमचा माल तेंव्हाच विकला तर मग आमचे पैसे काय तुमच्या कंपनीचे बँक कर्ज फेडण्यासाठी वापरले का?नाहीतर विकलेल्या मालाचे पैसे कुठे गेले? आता बँकेकडून कर्ज घेऊन शेतकऱ्यांना पैसे देऊ असे तुम्ही म्हणत आहात तर तुमची पत कमी झालेली असतांना कोणत्या आधारे बँक कर्ज देईल? कंपनीचा आर्थिक व्यवहार सुरळीत करण्यासाठी तुम्ही गोरगरीब शेतकऱ्यांचा पैसा वापरला असा घणाघात केला.
रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष श्री. पांडुरंग शिंदे म्हणाले की, आम्हाला कंपनी च्याविरोधात गुन्हा दाखल न करता आमच्या घामाचा दाम हवा आहे.रक्कम मिळवण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करणार आणि पाठपुरावा करणार असे म्हणाले.
अन्यायग्रस्त शेतकरी समितीचे समनव्ययक डॉ. सुरेश कदम म्हणाले कंपनीच्या मालकांवर दबाव तयार करून शेतकऱ्यांचे पैसे वसूल करणे हा आमचा उद्देश आहे. कंपनी व्यवस्थापकाकडे शेतकऱ्यांची प्रमुख मागणी अशी आहे की,किती शेतकऱ्यांची बाकी देणे आहे हे जाहीर करावे व रक्कम कधी देणार लेखी द्यावे. कंपनीचे मालक अजय बाहेती आजतगायत शेतकऱ्यांचे समाधान करू शकले नाहीत,फक्त उडवा-उडवीचे उत्तरे देत आहेत व गोड गोड बोलून असत्य बोलत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये चीड निर्माण झाली आहे.
या विरोधात पैसा मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. यावेळी समायोजित भाषणे सामाजिक कार्यकर्ते श्री. नीलकंठ ताकबीडकर, संभाजी ब्रिगेड चे श्री. गजानन पवार होटाळकर, मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत पवार, रयत क्रांती चे तालुका अध्यक्ष शहाजी पाटील कदम , व्यंकट पाटील, कैलास जाधव यांनी केली. सदरील शेतकरी जनआंदोलन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंद युवा परिषदेचे संयोजक श्री. रणजित देशमुख यांनी केले.यावेळी अन्यायग्रस्त शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.