![]() |
नांदेड| योगामुळे चित्तवृत्ती संतुलन साधून शारीरिक आणि मानसिक विकारांपासून मुक्ती मिळते. योग हे जीवनातील श्रेष्ठ ऐश्वर्य असून योगसाधक योगी विश्वातील सर्वात ऐश्वर्यवंत व्यक्ती असतो आणि त्याचे निरोगी जीवन हे सर्वश्रेष्ठ ऐश्वर्य असते, असे प्रतिपादन पूर्व शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे यांनी केले.
जागतिक योग दिनानिमित्त आज राष्ट्रमाता माध्यमिक विद्यालय संभाजीनगर येथे विशेष योगवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. योगगुरू देवीदासराव मोरे टेळकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली योगासने आणि प्राणायाम संपन्न झाल्यानंतर योगगुरू टेळकीकर यांच्या सत्कार प्रसंगी डॉ. नांदेडे यांनी वरील मत व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, योगामुळे आपपर भावाचा विलय होऊन सारे विश्व एक कुटुंब होते आणि माऊलींची विश्वकुटुंब ही संकल्पना साकार व्हायला मदत होते. शेतकरी आत्महत्या थांबवायचा असतील तर खेडेगाव, वाडी, तांडे, पाड्यापर्यंत लोकांना योगाची साधना शिकवायला हवी. समृद्ध भारताचे स्वप्न योगाच्या माध्यमातूनच साध्य करता येऊ शकते.
प्राचार्य डॉ अजय क्षीरसागर यांनी नेटके प्रास्ताविक केले. यावेळी दिगंबर क्षीरसागर, विवेक मोरे देशमुख, बालाजी महाजन, साहित्यिक व्यंकटेश चौधरी, बालाजी महाजन, अशोक पावडे, डॉ मुरलीधर फुलारी, विश्वनाथ रेनेवाड यांच्यासह अनेक योगसाधक उपस्थित होते.