गोडसेलवार यांनी तक्रार देताच लिलाव सोमवारी ठेवण्यात आला
हिमायतनगर| तालुक्यातील मौजे सरसम बु. येथिल विठ्ठलेश्वर देवस्थान जमिनीचा लिलाव मृग नक्षत्र लागुन चार दिवस उलटले तरी अद्याप झाला नसल्याने, तात्काळ लिलाव करण्यात यावा. अशी मागणी सरसमचे रहिवासी असलेले मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गोविंद गोडसेलवार यांनी जिल्हाधिकारी डॉ.विपीन नांदेड यांच्याकडे निवेदन देऊन करताच तहसीलदारांनी लिलावाची नोटीस जावक क्रमांक १६९४ द्वारे काढून दि.१४ सोमवारी लिलाव ठेवला आहे.
हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम येथील विठ्ठलेश्वर देवस्थानची २८ एकर जमीन नांदेड -किनवट राष्ट्रीय महामार्गावर आहे. या जमिनीचा मागील २० वर्षांपासून लिलाव होऊन एक वर्षासाठी जास्तीची बोली देणाऱ्या शेतकऱ्यास कसण्यासाठी दिली जात होती. यंदाचा खरीप हंगाम सुरु होऊनही महसूल विभागाकडून विठ्ठलेश्वर मंदिराच्या जमिनीचा लिलाव करण्यात आला नाही. महसूलच्या एका नायब तहसीलदाराने मागील काळात इतरांच्या नावे लिलाव दाखवून मंदिराची जमीन कसल्याने यंदाही काडीघोडे नाचवून स्वतः जमीन कसण्यासाठी लिलाव रखडत ठेवल्याचा संशय आला.
त्यामुळं येथील जमिनीचा लिलाव तात्काळ करण्यात यावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी डॉ.विपीन आणि तहसीलदार डी.एन.गायकवाड यांच्याकडे सरसमचे रहिवासी असलेले मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गोविंद गोडसेलवार यांनी डी.१० रोजी आवक क्रमांक १६४४ द्वारे सकाळी केली होती. याची तातडीने दखल घेत तहसीलदार डी.एन.गायकवाड यांनी विठ्ठलेश्वर जमिनीच्या सण २०२१-२२ सालसाठी जमीन कसण्याचा लिलावाची नोटीस जावक क्रमांक १६९४ नुसार काढून दि.१४ सोमवारी ग्रामपंचायत कार्यालय सरसम बु.येथे ठेवला आहे.
मागील काही वर्षपासून जमिनीचा लिलाव करण्यात येतो. प्रत्येक वर्षी १० टक्के अधिकच महसूल वाढून सदर जमिनीच्या मोबदल्याची रक्कम वाढत असल्याने हि जमिन काही वर्ष पडीक पडली होती. याकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे दिसून येताच महसूलच्या एका नायब तहसीलदाराने इतर व्यक्तीच्या नावाने कागदोपटरी लिलाव दाखवून स्वतः जमीन कसली होती. खरीप हंगाम संपताच रब्बी हंगामाच्या सुरुवातीला शेतातील २० ते २५ वर्ष जुनी असलेली १८ झाडे तोडून पर्यावरणाला बाधा पोचविली होती. शिवाय विक्री करून रक्कम हडप करण्याचा प्रयत्न केला होता. यावर गावकर्यांनी आवाज उठविताचं दोघांवर हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.