२०० ब्रास रेतीचे साठे जप्त करण्यात आल्याने माफियांचे धाबे दणाणले
दि.२० में रोजी सायंकाळी ४ वाजता हिमायतनगर येथील तहसील कार्यालयात झालेल्या महसूल, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बैठकीनंतर उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्याकडे पत्रकारांच्या शिष्टमंडळाने रेतीमुळे पर्यावरण धोक्यात आले याची चौकशी करून कार्यवाहीची मागणी केली होती. लागलीच उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी तालुक्यातील रेती घाटावर झालेल्या अवैद्य रेती उत्खननाच्या तक्रारीनंतर संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी व अधिकारास नदीकाठावरील अवैद्य साठे जप्तीची कार्यवाही करून महसूल वाढवावा असे आदेशित केले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दि.२१ मे रोजी दुपारी नायब तहसीलदार अनिल तामसकर यांनी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, तहसीलदार डी.एन.गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील मंडळ अधिकारी, तलाठी याना सोबत घेऊन दुपारी धानोरा, बोरगडी भागात धडकले.
सुरुवातील त्यांनी गावातील नागरिकांकडून माहिती घेऊन कार्यवाहीला सुरुवात केली. धानोरा गावखारीत उसालगत साठवून ठेवलेल्या रेतीचा अनधिकृत साठा जप्त केला. त्यानंतर मंडळ अधिकारी जाधव यांना घेऊन अचानक येथे उपस्थित झालेल्या पत्रकारांच्या टीमसोबत नदीकाठावर असलेल्या रेतीच्या साठ्याची पाहणी केली. यावेळी कुठे २५ ब्रास, कुठे २०, कुठे १५, कुठे १० कुठे ३५ ब्रास अश्या प्रकार ठिकठिकाणी रेतीचे साठे गायरान जमिनीसह शेती जमिनीत साठवून ठेवलेले निदर्शनास आले. या साठ्यांची पाहणी आणि मोजमाप करून रेतीचा अंदाजित २०० हुन अधिक ब्रास रेतीसाठा जप्त केला.
विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीकाठावरून अवैद्य रित्या रेतीचे उत्खनन करण्यासाठी कोणालाही कुठलीही परवानगी देण्यात आली नसताना काहीजण पथकाची नजर चुकवून चोरी करत असल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी तात्काळ या बाबत कठोर कार्यवाही करून माफियांच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र पथक पोचण्यापूर्वी महसूल विभागातील काही खाबुगिरीची सवय जडलेल्यानी नदीकाठावरील माफियांना याबाबतची माहिती देऊन कार्यवाहीत ढिलाई आणण्याचा प्रयत्न केला होता. तर अर्धवट भागातील रेतीसाठे पाहून मंडळ अधिकाऱ्यांनी मला नांदेडला जावे लागेल म्हणून काढता पाय घेतल्याने त्याच्याजवळ घेण्यात आलेल्या रेतीसाठ्याच्या मोजमापात काही गौडबंगाल होईल..? अशी शंका व्यक्त केली गेली तर नवलच काय.