दिघी रेतीघाटावरून बेकायदेशीर उत्खनन प्रकरणी कार्यवाही करा
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीकाठावरील व नाल्याच्या ठिकाणच्या एकही रेती घाटाचा मागील दोन वर्षांपासून लिलावात झाला नाही. असे असताना देखील शासन नियम १९६६ चे कलम ४८(७) चा भंग करत दिघीसह खडकी बा.येथील ट्रैक्टर चालक - मालक यांनी उत्खननाच्या सर्व नियमन बगल देऊन बेकायदेशीर रित्या रेतीचे उत्खनन करण्याचा गोरखधंदा मागील तीन ते चार महिन्यापासून चालविला आहे. यामुळे पर्यावरणाला बाधा पोचविली जात असून, दिघी येथून उत्तखनन केलेली रेती हिमायतनगर शहरातील बांधकाम धारकांना वाहतुकीचा अथवा उत्खननाचा परवाना नसताना रात्री-अपरात्रीला आणून विक्री केला जात आहे.
मागील दि.१३,१४,१५ रोजी रात्री ९ ते सकाळी ७ वाजेच्या दरम्यान दिघी येथून ४ ते ५ ट्रैक्टरद्वारे ६० ते ६० ब्रास रेती आणून टाकण्यात आली आहे. याची चौकशी करण्यासाठी पळसपूर रोड ते हिमायतनगर रुख्मिणी नगर भागापर्यंतच्या सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यास वाहनातून रेतीची वाहतूक होतांना दिसून येईल. यामधे दिसणारी वाहने जप्त करून विदर्भाच्या धर्तीवर वाहनासह चालक-मालक यांच्यावर कार्यवाही करावी. दिघी रेती घाट ज्या मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या अखत्यारीत आहे. त्यांच्या व त्यांच्या नजीकच्या नातेवाईकांच्या मालमत्तेची चौकशी आणि एटीएसम मोजणीतून निघणाऱ्या रेतीची शासकीय दंडाच्या दरानुसार निघणारी किंमत संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या मिळकतीतून कपात करावी.
तसेच दिघी पैनगंगा नदीकाठावरून साठवून ठेवलेली आणि गावकुशिजवळ ढिगारे मारलेल्या हजारो ब्रास वाळूचे साठे जप्त करून तो साठा गोरगरीब घरकुल लाभधारकांना शासकीय नियमानुसार अल्प दारात देण्यात यावा. यावर तातडीने कार्यवाही न झाल्यास महसूल अधिकारी, कर्मचारी याना जबाबदार धरून गौण खनिज खोदकाम वाहतुकीला मूकसंमती आहे असे गृहीत धरून दि.२७ मे पासून हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर बेमुद्दत व कोविड - १९ च्या सर्व नियमांचे पालन करून गोरगरीब घरकुल धारकांच्या हक्कासाठी जनहितार्थ आमरण उपोषण करण्यात येईल असेही निवेदनात म्हंटले आहे. या निवेदनाच्या प्रति तक्रारकर्ते राम गुंडेकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री, विभागीय आयुक्त औरंगाबाद, जिल्हाधिकारी नांदेड, उपविभागीय अधिकारी हदगाव, तहसीलदार हिमायतनगर यांना देण्यात आले आहे.