साध्या पद्धतीने पुरोहिताच्या हस्ते होणार शासकीय पूने उत्सव साजरा
हिमायतनगर| सलग दुसऱ्या वर्षीही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे शासन स्तरावरून यात्रा, उरूस आदी उत्सवांना बंदी घालण्यात आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर मारोती मंदिर कुलूपबंद असून, रामनवमी पासून होणारी हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी येथील प्रसिद्ध मारोती मंदिर देवस्थानची यात्रा व यात्रेतील सर्व कार्यक्रम यंदाही रद्द करण्यात आली असल्याची माहिती मंदिर कमिटीचे अध्यक्ष संजय भैरवाड यांनी दिली.
महाराष्ट्रासह, विदर्भ, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बोरगडी तालुका हिमायतनगर येथील प्रसिद्ध ग्रामदैवत श्री मारोती मंदिर संस्थांच्या वतीने भरविण्यात येणाऱ्या यात्रेत भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात. नवसाला पावणाऱ्या मारोतीरायाला प्रीय असलेली रुचकीच्या पाने - फुलांची पुष्पमाला, नागेलीच्या पानांची माळ, दस्ती टोपी, फेटा अर्पण करुन सर्व संकट, दुखः दुर करून, धन -धान्य, संततीची मनोकामना भक्त करत. मध्यरात्रीपासून मारोतीरायाच्या दर्शनासाठी दाखल विदर्भ - तेलंगाना - कर्नाटक - मराठवाड्यातील ग्रामीण भागातील श्रध्दाळु भाविक दाखल होऊन मारोतीरायाच्या दर्शनासाठी रांगा लावतात. आणि सकाळी संकटमोचन, अंजनीपुत्र हनुमान.. बजरंग बली की जय... पवनसुत हनुमान की जय.. अशा जयघोषात नारळ फोडुन प्रसाद अर्पण करून आपला नवस फेडतात.
यात्रेची सुरुवात दि.२१ श्रीरामनवमी पासून सप्ताहाला सुरुवात होऊन चैत्र शुद्ध १५ मंगळवार दि.२७ रोजी हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. दरम्यान विविध धार्मिक, सामाजिक, कार्यक्रम, कीर्तन, कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाते. तर समारोपाच्या दिवशी तालुक्यातील तमाम कुस्ती शौकीन व मल्ल येथील आखाड्यात हजेरी लाऊन यात्रेची शोभा वाढवातात. मात्र कोरोनाचा वाढत प्रभावामुळे यंदाही भाविकांना मारुतीरायाचे दर्शन घरूनच घ्यावे लागणार आहे. कारण शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्यामुळे मंदिरातील श्रीची पूजा, माहाआभिषक शासकीय पद्धतीने पुरोहित कांतागुरु वाळके यांच्या हस्ते करण्यात येईल अशी माहिती मंदिर कमिटीचे अध्यक्ष संजय भैरवाड, गणपत काईतवाड, लक्ष्मण बहिरवाडी, बजरंग शिंदे, रामराव कोळगिर, आडेलू गुंडेवाड, विलास काईतवाड, विलास काईतवाड, प्रभाकर क्षीरसागर, विष्णू सोलकर, अविनाश शंनेवाड, पुंडलिक यनगूलवाड, परमेश्वर गुझलवाड, सोपान पांचाळ आदींसह मंदिर कमेटीकडून सांगण्यात आले आहे. सलग दुसऱ्या वर्षी नवसाला पावणाऱ्या मारोती रायाची यात्रा रद्द झाल्याने भाविकांना दर्शन व आशिर्वादापासून वंचित राहावे लागणार आहे.