शहरात आणून विकले जाते ७ ते ८ हजार ब्रास दराने रेतीची विक्री
हिमायतनगर| तालुक्यातील पैनगंगा तीरावर असलेल्या कोठातांडा घाटावरून वाळू माफियांकडून अवैद्य रित्या रेतीचे उत्खनन केले जात आहे. एवढेच नाहीतर हि बाब लक्षात येऊ नये म्हणून तस्करांनी नवी शक्कल लढवीत आता गाढवाच्या साहाय्याने नदीपात्रातून रेती वर आणली जात आहे. याकडे तहसील प्रशासन मात्र याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करून शासनाचा लाखोचा महसुलावर पाणी फिरवत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे. यामुळे पर्यावरण धोक्यात आले असून, परिणामी त्यांना विरोध करताना नदीकाठावरील नागरिकांना माफियांच्या दादागिरीला सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात आले आहे.
विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीकाठावर कामारी, दिघी, घारापुर, रेणापूर, पळसपूर, धानोरा, वारंग टाकळी, कोठातांडा, एकंबा, सरसम मासोबा नाला, यासह अन्य रेती घाट आहेत. मागील पाच वर्षात येथील रेती पेंडचा लिलाव प्रशासनाने आपली वरकमाई होणार नई म्हणून चक्क रेतीच्या लिलावाला फाटा दिला आहे. परंतु लिलाव न झालेल्या रेती घाटावरून प्रशासनाचे नियम डावलून रेती तस्करांनी वाळू चोरीला सुरुवात केली आहे. मुख्यत्वे कोठातांडा पेंडावरून तस्करांकडून पाच ते दहा ट्रेक्टर द्वारे मोठ्या प्रमाणात अवैद्य रित्या दिवस-रात्र रेतीच्या उपसा केला जात आहे. परिणामी पर्यावरण धोक्यात आले असून, यामुळे महसुल प्रशासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडविल्या जात आहे.
हि बाब माहित असताना येथे कार्यरत तलाठी, मंडळ अधिकारी हे मात्र रेती तस्करांना आपल्या स्वार्थापोटी अभय देत आहेत. सध्या नदीपात्रात पाणी नसल्याने रेती तस्करांचा उच्छाद वाढला आहे. नदीपात्रातून गाढवाच्या साहाय्याने रेती वर आणून ट्रैक्टरमध्ये भरून शहरातील गरजू लोकांना ७ ते ८ हजार रुपये ब्रासने विक्री करत आहेत. नागरिकांच्या तक्रारी होताच कधीतरी मंडळ अधिकारी, तलाठी परिसरात फेफटका मारून रेती तस्करावर लहानशी कार्यवाही केल्याचे दाखून अर्थपूर्ण मैत्री करीत असल्याचा आरोप येथील जागरूक ग्रामस्थांनी प्रतिनिधीशी बोलताना केला आहे. त्यामुळेच येथे कार्यरत महसूल अधिकारी कर्मचारी मात्र महिन्याकाठी लाखोची माया जमवीत असल्याचे ग्रामस्थामधून बोलले जात आहे. या संदर्भात काहींनी तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पथक पाठवितो असे सांगितले असले तरी येथे कोणतेही पथक आले नाही. उलट रेती तस्करी करणाऱ्यांकडून हप्ता वाढऊन घेऊन, अर्थपूर्ण संबंध दृढ केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
रेतीचा गोरखधंद्याचा प्रकार उघड व्हावा म्हणून महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हिमायतनगर शहरातील विविध दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करावी. म्हणजे दिवस रात्र किती ट्रैक्टरने बिनधास्तपणे रेती चोरून विकली जाते याचे सत्य बाहेर येईल. आणि सीसीटीव्हीमध्ये दिसलेली सर्व ट्रैक्टर जप्त करून पुन्हा रेती तस्करी होणार नाही यासाठी पोलिसात गुन्हे दाखल करावे तरच हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगेला पोखरण्याचे प्रकार थांबतील असे पर्यावरण प्रेमी नागरिकांचे म्हणणे आहे.
दिघी-घारापूर येथील रेती घाटावरून देखील रेतीचा अमाप उपसा करून साठेबाजी केली जात आहे. तसेच जिथे बांधकाम सुरु आहे त्यांना अव्वाच्या सव्वा दराने रेतीची विक्री करण्याचे काम महसूल आधिकाऱ्याच्या संगनमताने सुरु आहे. अनेकदा तर रेती तस्कर पर्यावरणाचे नियम डावलून गौण खनिज अधिनियमांचं उल्लंघन करून चक्क सूर्य मावळाल्यानंतर ते सूर्योदय होईपर्यंत उत्खनन करतात. याबाबत अनेक तक्रारी झाल्या मात्र रेतीतस्करांचा गोरखधंदा सुरूच आहे. नुकतेच ऐक वाहन येथे पकडून जप्त करण्यात आले. तेंव्हा चक्क त्या रेतीतस्कराने माझा एकट्याचीच वाहन पकडून कार्यवाही केली, बाकीच्यांवर का..? आलेली जात नाही असा सवाल करत संबंधित अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहे. त्यांवरून यासह नदीकाठावरील अनेक रेती घाटावरून शासनाला महसूल देणाऱ्या गौण खनिज रेतीची तस्करी होते हे सिद्ध होत आहे.