नागरिकांनी घराबाहेर न पडता घरीच हनुमंताचे पूजन करावे
देशावर आलेले कोरोनाचे संकट दूर होण्याची प्रार्थना करावी
वाढोणा| हिमायतनगर शहर परिसरात गेल्या तीन दिवसात कोरोनाचे ७ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या बोरगडी येथील मारोतीरायाच्या मंदिरात (शासनाच्या गर्दी न जमन्याच्या आदेशाचे पालन करण्यासाठी) हनुमंतरायाचे दर्शन बंद करण्यात आला आहे. अशी माहिती मंदिर कमिटीचे अध्यक्ष संजय धर्मा भैरेवाड यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना देऊन नागरिकांनी देखील घराबाहेर न पडता घरीच बजरंगबली, हनुमंताचे पूजन करावे आणि देशावर आलेले कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर होण्यासाठी प्रार्थना करावी असे आवाहन त्यांनी केले.
हिमायतनगर (वाढोणा) शहर ते तेलंगणा आणि विदर्भाच्या सीमेवर वसलेले आहे. हिमायतनगर तालुक्यातील श्री परमेश्वर, कालिंका, महाकाली, लाकडोबा, बसवेश्वर, वरद विनायक, मानाचा वडाचा गणपती, पवनसुत हनुमान मंदिराप्रमाणे तालुक्यातील बोरगडी येथील तीर्थक्षेत्र मारोती मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिरात दर शनिवारी महापूजा- आरती करून मारुतीयाला नवस केला जातो. ज्यांची मनोकामना पूर्ण होते असे नागरिक भक्त नवस पूर्ण होताच रोट करून पूर्ण - पोळीचे नैवैद्य मारुतीरायाला अर्पण करून जेवण देतात. तसेच वर्षातून एकवेळ येणाऱ्या हनुमान जयंती उत्सव काळात विदर्भ - तेलंगाना - कर्नाटक - मराठवाड्यातील हजारो भाविक भक्त पदयात्रा करून मारोतीरायाला प्रीय असलेली रुचकीच्या पाने - फुलांची पुष्पमाला, नागेलीच्या पानांची माळ, दस्ती टोपी, फेटा अर्पण करुन सर्व संकट, दुखः दुर करून, धन -धान्य, संततीची मनोकामना भक्त करतात. त्यामुळे येथील मारूतिरायांची कीर्ती दूरदूरवर पसरलेली आहे, दरवर्षी येथे रामनवमी ते हनुमान जयंती पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह मारुतीरायाचा जन्मोत्सव होऊन भव्य कुस्त्याच्या दंगलीने यात्रेचा समारोप केला जातो. हि प्रथा गेल्या शेकडो वर्षांपासून अविरतपणे चालू आहे.
परंतु यंदा संबंध भारत देशावर कोरोना या महामारीचे संकट आल्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी २१ दिवसाचा लोकडाऊन जाहीर करून जनतेनी घराबाहेर पडू नये असे आवाहन केले होते. तसेच सर्व धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, उत्सव, कार्यक्रम, बैठक होणार नाहीत असे सांगून सर्वानी शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. तसेच १४४ कलम लागू करून ५ पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र जमू नये व कोरोनाचा प्रसार थांबवून देशावरील संकट दूर करण्याची लढाई सूरु केल्याने त्यांच्या आवाहनाला आणि शासनाच्या नियमाला अधीन राहून रामनवमीपासून गर्दी होऊ नये म्हणून 'करोना' बाबत प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी बोरगडी देवस्थान कमिटीने मंदिर बंद करून हनुमान जयंती उत्सव सोहळा रद्द केला होता. त्यानंतर संचारबंदीला शिथिलता आल्याने अनेकजण दर्शनास येत होते.
परंतु पुन्हा हिमायतनगर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि विषाणू हळूहळू पाय पसरू लागल्याने ७ रुग्ण पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यामुळे मारूतिरायांची महापूजा करून दर्शनासाठी मंदिर बंद करण्यात आले असल्याचे कमिटीचे अध्यक्ष संजय भैरवाड, उपाध्यक्ष गणपत काईतवाड, सचीव.लक्ष्मण भैरेवाड यांनी दिली. तसेच भाविक भक्तांनी मंदिर कमिटीला सहकार्य करून घरीच हनुमंताच्या प्रतिमेचे पूजन करून देशावर आलेले कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे अशी प्रार्थना करून वंदन करावे असे आवाहनही त्यांनी केलं आहे.