नांदेड| चोरट्यांनी दोन घर फोडले आहेत, एका दुकानात चोरी केली आहे, तीन मोटारसायकली चोरीला गेल्या आहेत. तसेच एका व्यक्तीची बॅंक खात्यात फसवणूक करण्यात आली आहे अशा एकूण 7 वेगवेगळ्या प्रकरणात 3 लाख 81 हजार 509 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
महाविरनगरमध्ये राहणारे शासकीय अधिकारी शंकर नारायण वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 29 जुलै रोजी सकाळी 11.55 ते दुपारी 4.43 या वेळेदरम्यान एस.बी.आय.शाखा नवा मोंढा नांदेड असे नाव सांगून कोणी तरी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला आणि त्यांच्या बॅंक खात्याची सर्व माहिती घेवून एटीएम खात्याची माहिती घेतली आणि त्यांच्या बचत खात्यातून 1 लाख 98 हजार 9 रुपये काढून घेवून त्यांची फसवणूक केली आहे. शिवाजीनगर पोलीसांनी याप्रकरणी फसवणूक आणि भारतीय तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे अधिक तपास करीत आहेत.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शारदानगर येथील किशोर बापूराव देशमुख यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.यु.9521 ही 20 हजार रुपये किंमतीची गाडी 5 ऑगस्टच्या सकाळी 9.30 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान चोरीला गेली आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार घुगे अधिक तपास करीत आहेत. दि.6 ऑगस्ट रोजी रात्री 8.30 ते 7 ऑगस्टच्या विष्णुनगर येथून एम.एच.26 बी.जे. 5591 क्रमांकाची दुचाकी गाडी 35 हजार रुपये किंमतीची चोरीला गेली. कृष्णा सोपनराव डुकरे यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार भगवान वडपत्रे अधिक तपास करीत आहेत. दिलीप बाबूलाल अग्रवाल यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.बी.8483 ही 20 हजार रुपये किंमतीची गाडी विस्तारीत रामानंदनगर मधून 1 ऑगस्ट रोजी पहाटे चोरीला गेली. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस नाईक मुंडे अधिक तपास करीत आहेत.
नरेश राघोजी गजभारे यांची धनेगाव पाटीजवळ मोबाईल शॉपी आहे. 6 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 7 ऑगस्टच्या सकाळी 6 वाजेदरम्यान कोणी तरी त्यांच्या बंद दुकानाचे शटर अर्धवट उचकून त्यातून 32 हजार रुपये किंमतीचे संगणक साहित्य चोरून नेले आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस हवालदार मुपडे करीत आहेत. बिलोली येथील आंबेडकरनगरचे रहिवासी सुरेश मरीबा श्रृंगारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 ऑगस्टच्या मध्यरात्री ते पहाटे 5 वाजेदरम्यान कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून सोन्याचे मनी, बदक आणि 10 ग्रॅम चांदीचे चैन , रोख रक्कम तसेच शेजारी राहणाऱ्या पावडे यांच्या घरातून 5 हजार रुपये रोख असा 35 हजाराचा ऐजव चोरून नेला आहे. बिलोली पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक माधव वाडेकर करीत आहेत.
अर्धापूर तालुका कृषी कार्याल्यातील कृषी अधिकारी भागवत साधू शिंगाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दरम्यान कृषी कार्यालयाचा कडीकोंढा तोडून कोणी तरी चोरट्यांनी आत प्रवेश केला.आतील बॅटरी, सीसीटीव्ही कॅमेरे, हार्डडिस्क, डीव्हीआर असा एकूण 41 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. अर्धापूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार रघुवंशी अधिक तपास करीत आहेत.