नांदेड| मयत वडीलांच्या नावे असलेल्या संपत्तीचा फेरफार करण्यासाठी 40 हजार रुपये लाच मागणी करून 30 हजार रुपये लाच स्विकारणाऱ्या तलाठ्यासह त्याचा सहकारी खाजगी माणसाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले आहे.
एका 40 वर्षीय तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार तलाठी सज्जा चांदोळा ता.मुखेड येथील तलाठ्याने त्यांच्या वडीलांच्या नावे असलेली शेत जमीन त्यांच्या इतर भाऊ आणि बहिणींच्या नावे फेरफार करून देण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच मागितली. चांदोळा तलाठी सज्जाचे तलाठी उदयकुमार लक्ष्मणराव मिसाळे (47) रा.सावित्रीबाई फुलेनगर कॅनोलरोड नांदेड हे आहेत. तक्रारदाराने दिलेली तक्रार 29 जुलै रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती. लाच मागणीची पडताळणी 1 ऑगस्ट रोजी करण्यात आली आणि मागणीची तडजोड झाली. या तडजोडीत 30 हजार रुपयांच्या लाचेवर फेरफार करण्याची बाब ठरली.
त्यानंतर तलाठी उदयकुमार मिसाळेने लाचेची 30 हजार रुपये रक्कम राहुल प्रल्हादराव परांडे (35) रा.कॅनालरोड नांदेड या माणसाच्या हस्ते स्विकारली. लाचेची रक्कम स्विकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठी आणि त्याच्या खाजगी सहकाऱ्याला जेरबंद केले आहे. ही लाचेची कार्यवाही पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर, अपर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील, पोलीस उपअधिक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक राहुल पखाले, पोलीस कर्मचारी बालाजी तेलंगे, गणेश तालकोकुलवार, सचिन गायकवाड, अंकुश गाडेकर आणि मारोती सोनटक्के यांनी पार पाडली. या प्रकरणी तलाठी आणि खाजगी माणसाविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.