जवानांचा घोर अपमान करणार्‍या काँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी झाली

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर चौफेर हल्ला  
सीमेवर देशाची सुरक्षा करणार्‍या जवानांचा घोर अपमान करणार्‍या काँग्रेसची अवस्था आज टायटॅनिक जहाजासारखी झाली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसह जे कोणी या जहाजात बसले, ते दररोज डुबण्याच्या अवस्थेत आहेत, कोणी आपला जीव वाचविण्यासाठी धडपड करीत आहे, अशा घणाघाती शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेडच्या विराट सभेत काँग्रेसवर चौफेर हल्ला चढवला.


शनिवारी रात्री असर्जन रोड कौठा येथे झालेल्या प्रचंड जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेडकरांना मराठीतून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देवून आपल्या भाषणाची सुरुवात केली. सुमारे 25 मिनिटे केलेल्या भाषणात मोदी यांनी काँग्रेस महाआघाडीवर चौफेर टिकास्त्र सोडले. ‘आदर्श गृहनिर्माण सोसायटीत’ झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी मोदी यांनी खा. अशोक चव्हाण यांचाही त्यांनी समाचार घेतला. पाच वर्षांच्या कार्यकाळानंतरही देशभरातील जनतेच्या मनातील विरोधी पक्षाविषयी विशेषतः काँग्रेस विषयीचा संताप आजही कायम आहे, असे देशात प्रथमच घडले आहे. नांदेड-अमृतसर ही सेवा काँग्रेसला सुरु करता आली नाही. ती आमच्या सरकारने करुन दाखवली, असेही मोदी म्हणाले. काँग्रेसाध्यक्ष राहूल गांधी यांच्यावर टिकास्त्र सोडताना मोदी म्हणाले, काँग्रेस 2014 पेक्षाही अधिक संकटात सापडली आहे.  आपल्यासाठी सुरक्षित मतदारसंघ शोधण्यासाठी देशभर मायस्क्रोस्कोप घेऊन फिरणार्‍या काँग्रेसच्या नामदाराला शेवटी अमेठी हाच मतदारसंघ सुरक्षित वाटला, अशी त्यांनी राहूल गांधी यांचे नाव न घेता खिल्ली उडवली.

महाराष्ट्रात गटबाजी
2014 मध्ये अवघ्या 44 जागांवर समाधान मानावे लागलेल्या काँग्रेसची स्थिती आज अत्यंत वाईट आहे. काँग्रेसचे सहकारी शरद पवार, प्रफुल्ल पटेल व हिंगोलीचे राजीव सातव यांनी मैदान सोडून पळ काढला. महाराष्ट्रात जेवढे आमदार तेवढी गटबाजी आहे. असाही टोला मोदी यांनी लगावला. प्रत्येक निवडणुकीत जातीपातीचे राजकारण करणार्‍या काँग्रेसने कर्नाटकच्या निवडणुकीत लिंगायत समाजासोबत काय केले? हे आम्ही विसरलो नाही, असे सांगून मोदी म्हणाले, फाळणीच्यावेळी कर्तारपूर साहिब हे पवित्र ठिकाण  भारतात ठेवण्याऐवजी या स्थळाला काँग्रेसने भारतापासून दुर ठेवले. काँग्रेसच्या कुटील डावामुळेच कर्तारपूर साहिब आज पाकिस्तानात गेले आहे, असा गंभीर आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.

देशात दोन पंतप्रधान
काँग्रेसला दोन पंतप्रधान हवे आहेत. एक दिल्लीत आणि दुसरा जम्मूत, असा आरोप करून मोदी म्हणाले, काँग्रेस काश्मीरबाबचा कायदा हटविण्याचा प्रयत्न करीत आहे, भारताचे तुकडे-तुकडे करण्यासाठी देशद्रोहाशी संबंधित कायदे रद्द करण्याचा काँग्रेसचा कट आहे. तसे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. हे जनतेला मंजूर आहे का? असा सवालही त्यांनी केला.

जवानांचा अपमान
सर्जिकल स्ट्राईक व एअर स्ट्राईकचे पुरावे मागणार्‍या काँग्रेसने भारतीय जवानांचा अपमान केला आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद, नक्षलवाद भडकवून आग लावण्याचे कटकारस्थान काँग्रेसने केले. परंतु ही आग सरकार विझविणार असल्याने काँग्रेस वेगवेगळ्या स्वरुपाचे षडयंत्र रचीत आहे. असाही आरोप मोदी यांनी केला. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली. या निवडणुकीत प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या रुपाने नांदेडच्या जागेवर भाजपचा विजय निश्चित होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपस्थित जनसागराच्या साक्षीने दिला. सुत्रसंचालन प्रविण साले यांनी केले. या जाहीरसभेला प्रचंड जनसागर उसळला होता.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी