निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांचे आवाहन
किनवट (अरुण तम्मडवार) येत्या 13 डिसेंबर रोजी होऊ घातलेली किनवट नगर परिषद निवडणूक भयपूर्ण व तणावयुक्त वातावरणात होऊ नये; तसेच निवडणुकीमध्ये सोशल मिडीयावर, पेड न्यूजच्या माध्यमातून प्रचार होऊ नये; त्याच प्रमाणे पैेसे वाटप, भेट वस्तू आदी प्रलोभनाद्वारे आदर्श आचार संहितेचा भंग होत असल्यास, नागरिकांनी निवडणूक विभागाच्या ‘कॉप’ या अॅपवर आपल्या तक्रारी नोंदविण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी
अजित कुंभार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नरेंद्र देशमुख व मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी केले आहे. किनवट नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राज्य निवडणुक आयोगाच्या वतीने ‘कॉप’ हे अॅप तयार करण्यात आले आहे. शहरामध्ये कोणताही राजकीय पक्ष, आघाडी व उमेदवारांकडून आदर्श आचार संहितेचा भंग होत असल्यास, त्याची तक्रार थेट या ‘कॉप’ अॅपवर करता येणार आहे. त्यामुळे पैसे वाटप, भेटवस्तू, सवलतीचे कूपन, बोकड व दारूच्या पार्ट्या बाबत सोशल मिडीयावर जाहीर प्रचार आदीबाबत सूज्ञ नागरिकांना थेट तक्रारी करता येणार आहे. नागरिकांनी गुगलवरून ‘कॉप’ हा अॅप डाऊनलोड करून घेऊन, येणारी न.प. निवडणूक तणाव व भयमुक्त तथा पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक विभागास सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.