आघाडीसाठी कॉंग्रेस - राष्ट्रवादी आणि
युतीसाठी भाजप व शिवसेनेत सकारात्मक चर्चा
किनवट (अरुण तम्मडवार) येथील नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी गुरूवारी (दि.23) नगराध्यक्षपदासाठी एकूण 11 नामांकनपत्र दाखल झाले असून, उमेदवार मात्र बारा आहेत. खबरदारी म्हणून सात उमेदवारांनी अपक्ष म्हणून दुसरा अर्ज दाखल केल्याने नामांकनपत्राची संख्या वाढली, अशी माहिती निवडणूक विभागाकडून प्राप्त झाली आहे. आज गुरूवारी उमेदवारी अर्ज भरण्यास खूपच गर्दी
झाल्याने, दुपारी तीन पर्यंत दाखल झालेले सर्व नामांकनपत्र घेणे गरजेचे होते. परिणामी सर्व सोपस्कार पूर्ण करीत अर्ज घेण्याची प्रक्रिया चालूच होती. त्यामुळे बातमी पाठविण्याच्या शेवटच्या क्षणी सदस्यपदासाठी गुरूवारी एकूण 141 नामांकनपत्र दाखल झाल्याची माहिती मिळाली; नावे मात्र प्राप्त होऊ शकली नाहीत.
नगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशनपत्र भरलेल्या उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे : शेख चॉंद रतनजी (भारतीय कॉंग्रेस व अपक्ष), शरद जयस्वाल (शिवसेना), सुनिल पाटील (शिवसेना), हाजी हबीबोद्दीन चव्हाण ( राष्ट्रवादी कॉंग्रेस व अपक्ष), शकीलोद्दीन बडगुजर (अपक्ष), आनंद मच्छेवार (भाजपा व अपक्ष), शेख नजीम चॉंदसाब (अपक्ष), सोपानराव केंद्रे (भारतीय कॉंग्रेस व अपक्ष), अभय महाजन (भारतीय कॉंग्रेस व अपक्ष), सुरेखा अंबादासराव काळे (भारतीय कॉंग्रेस), प्रविण इंद्रसिंग राठोड (राष्ट्रवादी कॉंग्रेस व अपक्ष), शंकरराव म्याकलवार (भारतीय कॉंग्रेस व अपक्ष). यापैकी पक्ष कोणाला उमेदवारी देईल हे पाहणे मनोरंजक ठरेल. कारण कॉंगेस व राष्ट्रवादीत आघाडी होण्यासाठी दोन्ही पक्षाकडून सकारात्मक चर्चा चालू असल्याची माहिती रा.कॉं.चे तालुकाध्यक्ष अनिल पाटील कर्हाळे यांनी दिली तर शिवसेनेचे आ. हेमंत पाटील किनवटला युतीच्या चर्चेसाठी आल्याचे समजते. भाजपाचे तालुकाध्यक्ष श्याम केंद्रे यांनीही युतीसाठी दोन्ही पक्षात समझोता होऊ शकतो असे सुतोवाच केल्याने अनेक उमेदवारांची इच्छा हवेतच विरणार असल्याने, ते पुढे काय पावित्रा घेतील हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शनिवार (दि.18) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली. पहिले तीन दिवस कुणीच अर्ज दाखल केले नाही. मंगळवारी (दि.21) प्रभागासाठी दोन तर नगराध्यक्षपदासाठी एक अर्ज दाखल झाला. बुधवारी (दि.22) मात्र तब्बल 28 उमेदवारांनी विविध प्रभागासाठी नामनिर्देशनपत्र दाखल केले. परंतु अध्यक्षपदासाठी बुधवारी कुठलाच अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे गुरूवारचे अध्यक्ष पदाचे एकूण 18 व पूर्वीचा एक असे नगराध्यक्षपदासाठी 19 उमेदवारी अर्ज झालेले आहेत. तसेच गुरूवार अखेर 9 प्रभागातील 18 सदस्यपदासाठी अर्जाची संख्या पूर्वीचे 30 व आज गुरूवारचे 111 मिळून एकूण 141 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. प्रभागाकरिता दाखल झालेल्या उमेदवारी अर्जात प्रामख्याने माजी नगराध्यक्ष इसाखान सरदारखान, माजी नगरसेवक व्यंकटराव भंडारवार,माजी न.प.उपाध्यक्ष अनिल तिरमनवार, सध्याचे नगरसेवक सूरज सातुरवार, माजी नगराध्यक्ष के.मूर्ती यांची स्नुषा कल्पना स्वामी कलगोटूवार, श्रीनिवास किशनराव नेम्मानीवार, माजी नगरसेविका सुरेखा राजू उटलावार, युसूफखान ही नावे उल्लेखनीय आहेत.