कंधार (सचिन मोरे) नगरविकास राज्य मंत्री रणजित पाटील यांनी कंधारच्या नगराध्यक्ष शोभाताई नळगे यांना पदापासून हटवल्यानंतर रिक्त झालेल्या नगराध्यक्षाच्यापदावर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे खंदे समर्थक सेनेच्या उपनगराध्यक्ष महंमद जफरोद्यीन यांची दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली. सौ.शोभाताई नळगे बाहेर गावी गेल्याने गुरुवार दि.२३ नव्हेंबर रोजी एकतर्फी जफरोदिन यांना अध्यक्षपदाचा पदभार सोपवण्यात आला.
स्विकृत सदस्य निवड प्रक्रियेत नगराध्यक्षा सौ. शोभाताई नळगे यांनी नियमबाह्य कृती केल्याचा ठपका ठेवून नगरविकास मंत्र्यांनी त्यांना पदापासून दूर केले होते. या पूर्वीही १४ ऑगस्टला नळगे यांना मंत्र्यांनी पायउतर केले होते. त्यावेळीही जफरोद्दीन यांच्याकडे अध्यक्षपद सोपवण्यात आले होते. यावेळीही एक महिना २२ दिवसानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्यांच्याकडे अध्यक्षपदाचा पदभार देण्यात आला. १४ ऑगस्ट ते पाच ऑक्टोबर या कालावधीत पाहिल्या टर्ममध्ये त्यांनी अध्यक्षपद सांभाळले होते. दुसऱ्या टर्ममध्ये किती काळ त्यांच्याकडे अध्यक्षपदाचा पदभार राहील या बाबत आज भाकीत करणे संयुक्तिक होणार नाही.
आधीच त्रिशंकूमूळे पालिकेच्या राजकारणात विस्कळीतपणा आलेला आहे. दोन्हीगट एकमेकांच्या टंगळ्या खेचत असल्याने विकासकामे रखडत पडली आहेत. दोन पावले मागे घेण्याची तयारी आमदार चिखलीकरांची आहे ना, कॉग्रेसचे नेते माजी नगराध्यक्ष अरविंद नळगे यांची आहे. प्रतिष्ठेसाठी उभय नेते नागरीकांना वेठीस धरत असताना मध्येच अध्यक्ष प्रकरण उभे ठाकले आहे. या प्रकरणामुळे पालीकेच्या राजकारणात भुकंप सदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. पालीका राजकारणावर वर्चस्व स्थापीत करण्यासाठी चिखलीकर आणि नळगे संधी शोधत असुन अध्यक्ष प्रकरण "कॅश" करण्याच्या प्रयत्नात त्यांचा नागरिकांच्या हक्काकडे मात्र दुर्लक्ष होतो आहे.
उच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी
नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या निर्णयाला आव्हाण देणारी याचिका शोभाताई नळगे यांनी गुरुवारी दि.२३ नव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. न्यायालयाने या प्रकरणावर सोमवारी सुनावणी ठेवली असल्याची माहिती सुत्रकडून मिळाली आहे. हे प्रकरण लवकरच निकाली निघेल किंवा प्रलंबित राहील असे नागरिकांत तर्कवितर्क केले जात आहे.